
बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत हिंसाचार! काँग्रेस कार्यकर्त्याच्या हत्येनंतर खासदाराची सैन्य तैनात करण्याची मागणी
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीसंदर्भात हिंसाचार तीव्र झाला आहे. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालांना पत्र लिहून निवडणुकीसाठी केंद्रीय सैन्य तैनात करण्याची मागणी केली आहे.
काल पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर चौधरी यांनी ही मागणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ८ जुलै रोजी पंचायत निवडणुका होणार आहेत.
या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राज्यपालांना पत्र लिहून पंचायत निवडणुकांमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी केंद्रीय दलांची व्यवस्था करण्याची विनंती केली.
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, मुर्शिदाबादच्या खारग्राममध्ये काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली, पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. खुनाच्या आरोपींना खारग्राम प्रशासनाचे संरक्षण मिळाले आणि त्यानंतर ही हत्या करण्यात आली.याचा निषेध केला जाईल. तृणमूल काँग्रेसला बुलेटची निवडणूक हवी की बॅलेटची निवडणूक? तृणमूल काँग्रेसला आम्ही हे रक्ताचे राजकारण करू देणार नाही असेही ते म्हणाले.