esakal | विधान परिषदच नाही, मग ममता मुख्यमंत्री कशा होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banarjee

विधान परिषदच नाही, मग ममता मुख्यमंत्री कशा होणार?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या विधानसभा (West Bengal Assembly Election 2021) निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं (TMC) बहुमत मिळवलं पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांना नंदीग्राममध्ये (Nandigram) पराभवाचा धक्का बसला. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी 1700 हून अधिक मतांनी विजय मिळवला. या निकालावरूनही बराच गोंधळ झाला. सुरवातीला ममता बॅनर्जी 1200 मतांनी विजयी झाल्याचे वृत्त आले होते. मात्र नंतर त्यांचा पराभव झाला असल्याचं निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केलं. यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचंही सांगितलं. आता राज्यात सत्ता मिळाली असली तर ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानं मुख्यमंत्रीपदाचं काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात विधानपरिषद नसल्यानं आता पुढे काय याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. (west bengal mamata banarjee nandigram suvendu adhikari won TMC CM)

नंदीग्राममध्ये पराभवानंतर ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदी राहणार का? यावर राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून ममताच पुन्हा एकदा खुर्चीत बसतील. भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून नितिश कुमार, योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे हेसुद्धा त्यांच्या राज्यात विधान परिषदेचे सदस्य आहेत. मात्र विधानसभेचे नाहीत. जनतेतून निवडून न येता त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. नितिश कुमार यांनी तर 36 वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवली होती. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढवली नाहीय.

हेही वाचा: पलानीस्वामींचा राजीनामा, स्टॅलिन होणार पहिल्यांदाच मुख्यमंत्री

इतर राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालची परिस्थिती वेगळी आहे. इथं विधान परिषद नसल्यानं ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होण्यासाठी काय करणार याची चर्चा केली जात आहे. तृणमूल काँग्रेसने अशा प्रकारची व्यवस्था तयार करणार असल्याचं म्हटलं आहे. कलम 164 नुसार एखादा मंत्री सलग सहा महिन्यांपर्यंत जर कोणत्या राज्याच्या विधानमंडळात नसेल तर तो मंत्री पदावर राहू शकत नाही. याचाच अर्थ ममता बॅनर्जींकडे आता सहा महिन्यांचा कालावधी आहे. पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद नसल्यानं ममता बॅनर्जींना रिकाम्या जागेवरून अर्ज दाखल करावा लागेल आणि पोटनिवडणूक जिंकावी लागेल.

loading image
go to top