पश्चिम बंगालमध्ये पुन्हा रक्तपात; एक ठार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 जून 2019

तणाव लक्षात घेऊन शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून दुकाने, व्यापारी संकुले आणि अन्य आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत.​

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील 'उत्तर 24-परगणा' जिल्ह्यात भाटपाडा भागात दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत एक व्यक्ती मरण पावली, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत या भागात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

आजच्या संघर्षात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव रामबाबू शॉ असे असून, अन्य गंभीर जखमींची नावे मात्र समजू शकलेली नाहीत. या भागातील तणाव लक्षात घेऊन शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून दुकाने, व्यापारी संकुले आणि अन्य आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत.

याबाबत माध्यमांशी बोलताना बराकपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार अर्जुन सिंह म्हणाले, ''बराकपूरमधील हिंसाचाराला तृणमूल कॉंग्रेसचे गुंड आणि स्थानिक पोलिस जबाबदार आहेत.'' भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले, "याबाबत भाजप आमदारांचे शिष्टमंडळ बराकपूरला भेट देणार असून, ते यासंदर्भातील अहवाल राज्याच्या गृहमंत्र्यांना सादर करेल.'' 

तातडीची बैठक 
या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने सचिवालयामध्ये पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावत परिस्थितीचा आढावा घेतला. येथील भाटपारा परिसरामध्ये 19 मेपासून सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत असून, याची सुरवात विधानसभा पोटनिवडणुकीपासून झाली होती. येथील दंगलीला आज सकाळपासून सुरवात झाली होती. या वादाला भाजप विरुद्ध तृणमूल कॉंग्रेस अशीही किनार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West Bengal violence leaves one dead