वीरभूम हिंसाचार प्रकरण: आतापर्यंत २२ जण अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीरभूम हिंसाचार प्रकरण

वीरभूम हिंसाचार प्रकरण: आतापर्यंत २२ जण अटकेत

कोलकता : वीरभूम जिल्ह्यातील हिंसाचारप्रकरणी पश्‍चिम बंगाल पोलिसांनी आतापर्यंत २२ जणांना अटक केली आहे. तृणमूल कॉग्रेसचे नेते बहादूर शेख यांची सोमवारी रात्री बागतुई येथे हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात दोन मुलांसह आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीत मृत बहादूर शेख यांच्या मुलाचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रामपूरहटजवळील बागतुई येथील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी पश्‍चिम बंगाल सरकारने एसआयटी स्थापन केली असून अतिरिक्त महासंचालक (सीआयडी) ग्यानवंत सिंह यांच्या नेतृत्वाखाली घटनेची चौकशी करत आहे. याशिवाय घटनास्थळाची न्यायवैद्यक चाचणी करण्यात येत असून हिंसाचाराचे स्वरूप या तपासणीतून कळेल, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील या प्रकरणाचा तपासणी अहवाल राज्य सरकारकडे मागितला आहे. दरम्यान, डाव्या आघाडीने आज रामपूरहाट येथे मोर्चा काढला आणि हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.

ममता म्हणाल्या...

वीरभूम हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, की सरकार आमचे असून आम्हाला जनतेची काळजी आहे. लोकांना त्रास होईल, असे आम्हाला कधीही वाटणार नाही. कालची घटना दुर्दैवी आहे. याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आपण रामपूरहाटला जात आहोत. आपण या घटनेचे समर्थन करत नाही, परंतु गुजरात आणि राजस्थानमध्येही अशा प्रकारचा हिंसाचार घडला आहे. आम्ही निष्पक्ष कारवाई करू.

राज्यपाल काय म्हणाले ?

राज्यपाल जगदीप धनकर यांनी बंगाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात केवळ हिंसाचार आणि अराजकतेचे वातावरण असल्याचे दिसून येते. मुख्य सचिवांकडे आपण अहवाल मागितला आहे. पीडित कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे धनकर म्हणाले.

गृहमंत्रालयाने मागविला अहवाल

हिंसाचारप्रकरणाची दखल घेत गृहमंत्रालयाने जनतेच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावीत, असे निर्देश दिले आहेत. पश्‍चिम बंगालचे अध्यक्ष सुकांतो मजूमदार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या खासदारांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. गृहमंत्री अमित शहा या घटनेवर लक्ष ठेवून असून त्यांनी याप्रकरणी राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

घटना काय घडली?

रामपूरहाट येथील बहादूर शेख यांच्यावर सोमवारी चार गुंडांनी हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संतापलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संशयितांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकले. त्यामुळे ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांत दोन बालकांचा समावेश आहे.

Web Title: West Bengal Virbhum Crime Mamta Banerjee Meet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..