प. बंगालच्या नामांतरास बांगलादेशचा विरोध 

प. बंगालच्या नामांतरास बांगलादेशचा विरोध 

कोलकता : पश्‍चिम बंगालचे "बंगाल' असे नामकरण करण्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे पाठविला असून, यावर केंद्राने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने खुद्द ममता सरकारवर संतापल्या आहेत. ममतांनी या प्रकरणी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहीत सरकारच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

राज्याच्या नामांतराबाबतचा प्रस्ताव राज्य विधिमंडळाने संमत करून तो केंद्र सरकारकडे पाठविला असून, केंद्र सरकारने यावर कोणतेही उत्तर दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत गृहमंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी यावर आम्ही परराष्ट्र मंत्रालयाकडून मत मागविले असल्याचे स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भाने गृहमंत्रालयालाच एक सविस्तर पत्र लिहिले असून, यामध्ये पश्‍चिम बंगालचे "बांगला' असे नामांतर करण्यास बांगलादेशानेच विरोध केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

जगभरात बांगलादेशालाच "बांगला' असे संबोधले जाते, त्यामुळे पश्‍चिम बंगालने हे नाव वापरू नये, असे त्या देशाचे म्हणणे आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याने ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. पण, केंद्राकडून याबाबत पश्‍चिम बंगाल सरकारशी अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. खुद्द ममता यांनी मात्र बांगलादेशचा हा दावा फेटाळून लावला आहे. 

पाकिस्तानचा दाखला 

भारतामध्ये जसे पंजाब आहे तसेच ते पाकिस्तानातदेखील आहे, राज्यातील लोकांच्या भावना लक्षात घेऊनच आम्ही नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. बंगाली भाषेत पश्‍चिम बंगालचे "बांगला' करायला हवे, इंग्लिशमध्ये ते "बेंगाल' आणि हिंदीमध्ये "बंगाल' असे नाव केले जावे, असेही ममतांनी म्हटले आहे. भाजपने मात्र राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. राज्याचे नाव बदलण्याचा ममतांचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचेही यात म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com