
राम मंदिर निर्माणासाठी बनलेल्या राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराचे प्रस्तावित आराखड्याचे छायाचित्रे जाहीर केली आहेत.
अयोध्या- अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अयोध्येतील राम मंदिर तयार होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. अयोध्येतील सोहळ्यासंबंधीची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. शिवाय अयोध्येत निमंत्रितांचे येणेही सुरु झाले आहे. अशात राम मंदिर निर्माणासाठी बनलेल्या राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराचे प्रस्तावित आराखड्याचे छायाचित्रे जाहीर केली आहेत. मंदिराचे मॉडेल वास्तुकार निखिल सोमपुरा यांनी तयार केले आहे. याआधी मंदिराचा जूना मॉडेल समोर आला होता. आता डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मंदिराच्या मॉडेलची उंची, आकार, क्षेत्रफळ आणि पायाभूत संरचनामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
मंदिर बांधून तयार होण्यासाठी तीन-चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मंदिर तीन मजली असणार असून मंदिर वास्तुशास्त्रानुसार बनवण्यात येणार आहे.
मंदिराच्या शिखराची उंची वाढवून 161 फूट करण्यात आली आहे. याशिवाय घुमटांची संख्या तीनवरुन पाच करण्यात आली आहे. मंदिराच्या आकारातही वाढ करण्यात आली आहे.
राम मंदिराच्या उंचीमध्ये 33 फूटांनी वाढ करण्यात येणार आहे. मंदिराच्या जून्या मॉडेलनुसार मंदिराची उंची 268 फूट 5 इंच होती. याला वाढवून 280 ते 300 फूट करण्यात येणार आहे.
जेथे रामलल्लाचे गर्भगृह बनणार आहे, त्याच्यावरच्या भागालाच शिखर बनवलं जाणार आहे. मंदिराला पाच घुमट असतील. मंदिराची भव्यता वाढवण्यासाठी घुमटांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राम मंदिराच्या पाच घुमटांच्या खाली चार भाग असणार आहेत. येथे सिंहद्वार, नृत्य मंडप, रंगमंडप बनवला जाणार आहे. येथे भाविकांच्या बसण्यासाठी आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी जागा असणार आहे.
मंदिराची भव्यता वाढवण्यासाठी मंदिराच्या जमिनीचे क्षेत्रफळही वाढवण्यात आलं आहे. राम मंदिर कार्यशाळेमध्ये कोरकाम केलेली दगडेच मंदिरामध्ये वापरली जाणार आहेत.
माती परिक्षणाच्या आधारावर मंदिराच्या पायाची खोली केली जाणार आहे. पायाची खोली 20 ते 25 फूट असू शकते. राम मंदिराच्या नव्या मॉडेलमध्ये एकूण 318 खांब असणार आहेत. मंदिराचे शिल्पकार सोमपुरा यांच्या म्हणण्यानुसार मंदिराच्या बांधकामासाठी एकूण 100 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. शिवाय यात वाढ होण्याची शक्याताही त्यांनी व्यक्त केली आहे.
राम मंदिराचे डिझाईन नागर पद्धतीचे आहे. 5 ऑगस्ट रोजी पहिली विट रचल्यानंतर मंदिराचे बांधकाम सुरु होईल. साडेतीन वर्षात मंदिर बांधून पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंदिर केव्हा पूर्ण होईल याची अनेकांना उत्सुकता आहे.
(edited by-kartik pujari)