
Gautam Adani : अदानींसोबत नाव आलेले 'चांग चुंग लींग' आहेत तरी कोण?
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोदी आणि अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचे जवळचे संबंध असून अदानी गैरव्यवहार करत असूनही मोदी त्यांची चौकशी करत नाहीत असा आरोप त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर चीनच्या 'चांग चुंग लींग' नावाच्या व्यक्तीचाही अदानी यांच्यासोबत संबंध असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.
अदानी कुटुंबाने गैरव्यवहार केल्याचा आरोप करताना त्यांनी गार्डीयन आणि फायनान्शियल एक्स्प्रेस या वृत्तपत्रांचा दाखला दिला. 'नासर अली' आणि 'चांग चुंग लींग' या व्यक्तीचाही राहुल गांधी यांनी यामध्ये उल्लेख केला आहे. पण हिंडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर काँग्रेसने चांग चुंग लींग आणि अदानी यांच्या संबंधाबाबत सवाल उपस्थित केले होते. अदानी आणि चांग चुंग लींग यांची भागिदारी आहे, सिंगापूर येथे ते एकाच कार्यालयात काम करतात असा आरोप काँग्रेसने केला होता.
कोण आहेत चीनचे चांग चुंग लींग?
हिंडनबर्गच्या अहवालानुसार, चांग चुंग लींग हे गुडामी इंटरनॅशनल ही कंपनी चालवतात. फसवणुकीच्या तपासादरम्यान गुडामी इंटरनॅशनल लिमिटेडची ओळख पुढे आल्याची माहिती आहे. चांग चुंग-लींग यांनी गौतम अदानी यांचा भाऊ विनोद अदानी यांचा सिंगापूरमधील निवासी पत्ता शेअर केल्याचेही समोर आले आहे.
चार वर्षांपूर्वी प्रसिद्धीझोतात आले
ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याची चर्चा सुरू असताना गुडामी इंटरनॅशनल ही कंपनी प्रकाशझोतात आली. सिंगापूरच्या तीन कंपन्यांमध्ये या कंपनीचेही नाव होते. गुडामीने अदानी यांच्या संस्थांमध्ये ४.५ अब्ज डॉलर किमतीची भागिदारी असलेल्या मॉन्टेरोसा इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्जच्या अनेक फंडांमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली. त्याचबरोबर चुंग-लींग यांनी अनेक अदानी कंपन्यांचे संचालक म्हणून काम केले आहे.
हिंडेनबर्ग यांनी एक मोठा खुलासा केला
हिंडेनबर्ग अहवालानुसार, २०११ मध्ये अदानी पॉवरमध्ये विलीन होऊन ४२३ दशलक्ष नफा कमावणाऱ्या ग्रोमोर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट या कंपनीशी चुंग-लींग हे संबंधीत आहेत. चिंग लींग हे ग्रोमोर ही कंपनी चालवत असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली होती. पण हे सर्व आरोप अदानी ग्रुपने फेटाळून लावले आहेत.
यूएस रिसर्च फर्मनुसार, चांग चुंग-लींग यांचा मुलगा तैवान या देशामध्ये पीएमसी प्रोजेक्ट्सचा मालक आहे. त्याचबरोबर तैवानच्या स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो अदानी ग्रुपचा तैवान येथील प्रतिनिधी आहे. पण अदानी यांनी माध्यमांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांनी चांग चुंग लींग आणि अदानी यांच्या संबंधावरून मुद्दा उपस्थित केल्यामुळे आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत.