एक चेहरा... की, कई चेहरे?

प्रकाश अकोलकर
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

लखनौ : उत्तर प्रदेशातील जनतेपुढे सध्या एक नव्हे, तर दोन प्रश्‍न उभे आहेत! पहिला प्रश्‍न हा अर्थातच या निवडणुकीनंतर सत्ता कोणाची येणार? तर, दुसरा भारतीय जनता पक्षाची सत्ता आलीच तर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस यांची आघाडी, तसेच बहुजन समाज पक्ष यांपैकी कोणाची सत्ता आली, तर दुसऱ्या प्रश्‍नाचे उत्तर अगदीच सोपे होऊन जाते. मग अखिलेश यादव वा मायावती यांपैकीच कुणीतरी लखनौच्या नवाबीवर आपला हक्‍क प्रस्थापित करणार. मात्र, भाजपची सत्ता आलीच तर...

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी "फायरब्रॅण्ड' पोलिस अधिकारी किरण बेदी यांचे नाव मुक्रर केले आणि त्याचा फटकाही खाल्ला. त्यानंतर झालेल्या कोणत्याच निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे न करता, "नरेंद्र मोदी' याच नावाच्या करिष्म्याभोवती संपूर्ण निवडणूक फिरती ठेवली आणि उत्तर प्रदेशातही तोच कित्ता भाजप गिरवू पाहत आहे. असे असले तरी, आता या गंगा- यमुनेच्या खोऱ्यात आपलीच सत्ता येणार, असे गृहीत धरून भाजपमधील अनेक नेते मनात मांडे खाऊ लागले आहेत... आणि ही यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

या यादीत पहिले नाव हे अर्थातच लखनऊचे महापौर दिनेश शर्मा हे आहे. उत्तर प्रदेशात महापौरपदाची निवडणूक थेट मतदानाने होते आणि दिनेश शर्मा हे आपल्या कॉंग्रेस प्रतिस्पर्ध्याचा पावणेदोन लाख मतांनी पराभव करून दुसऱ्यांदा महापौरपदी दिमाखात विराजमान झाले आहेत. "मिस्टर क्‍लीन' प्रतिमा असलेले शर्मा हे उच्चविद्याविभूषित असून, महापौर होण्यापूर्वी ते लखनौ विद्यापीठात प्राध्यापक होते. यापाठोपाठ नाव आहे ते आपल्या वादग्रस्त वक्‍तव्यांमुळे प्रसिद्धपुरुष बनलेले केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा यांचे. त्याशिवाय, आणखी एक शर्माही गुडघ्याला बाशिंग बांधून या शर्यतीत उतरू पाहात आहेत. ते आहेत भाजपच्या "मीडिया सेल'चे निमंत्रक आणि सरचिटणीस श्रीकांत शर्मा! अमित शहा यांच्या हाती भाजपची सूत्रे आल्यानंतर हे श्रीकांत शर्मा अचानक राष्ट्रीय पातळीवर चमकू लागले असून, ते मथुरामधून विधानसभा लढवत आहेत. आचार संहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर खटलाही गुदरण्यात आला आहे. "मिस्टर चमको' असे टोपणनावही त्यांनी आपल्या वर्तनाने कमावले आहे!

त्याचबरोबर भाजपचे प्रवक्‍ते आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू सिद्धार्थनाथ सिंग हेही या शर्यतीत असल्याचे लखनऊ प्रेस क्‍लबच्या परिसरात ऐकायला मिळाले! भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांचेही नाव या यादीत आहे. गेल्या जानेवारीत त्यांच्या हाती भाजपनेही प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे दिली, ती त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले निकटचे संबंध लक्षात घेऊनच! त्यांच्या या नियुक्‍तीमुळे संघपरिवारात उत्साह आल्याचे सांगितले जात आहे! त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच लहानपणी तेही आपल्या वडिलांच्या चहा स्टॉलवर त्यांना मदत करत होते! आता हा योगायोग त्यांना मुख्यमंत्रिपद बहाल करतो का बघायचं...

मात्र, या पलीकडची काही नावेही लखनौत मुख्यमंत्रिपदासाठी घेतली जात आहेत आणि त्यात अर्थातच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव आहे. शिवाय, माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांचेही नाव चर्चेत आहे. ते ब्राह्मण तर आहेतच आणि लखनौमध्ये कोणे एकेकाळी त्यांच्या नावाचा बराच दबदबा होता.
या यादीत अखेरचे नाव हे योगी आदित्यनाथ यांचे आहे! ते 1998 पासून गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सातत्याने करत असले तरी, त्यांनी मध्यंतरी भाजप नेतृत्वाशी "पंगा' घेऊन केलेली "हिंदू युवक सेने'ची स्थापना हा त्यांच्या मार्गातील मोठा अडसर आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही भाजप आदित्यनाथ यांना उतरवणार, अशी काही दिवसांपूर्वी चर्चा होती. मात्र, हा "जुगार' काही भाजपने खेळलेला नाही. आदित्यनाथ यांच्या हिंदू युवक सेनेचे काही उमेदवारही सध्या भाजपविरोधात उभे आहेत. तरीही त्यांच्या नावाभोवतीचा करिष्मा लक्षात घेऊन, त्यांच्या दिमतीला सध्या भाजपने एक विमान दिले आहे आणि ते आपल्या घणाघाती प्रचारात दंग आहेत!

अर्थात, सत्ता आलीच तर भाजप अचानक कोणी "डार्क हॉर्स' बाहेर काढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तरीही आजमितीला या यादीत सर्वांत आघाडीवर आहेत, ते लखनौचे महापौर दिनेश शर्माच!

Web Title: who will be chief minister of up?