कौन बनेगा मुख्यमंत्री?; नवा चेहरा की जुनाजाणता? 

Congress
Congress

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा मुख्यमंत्री कोण, याकडे लक्ष लागले आहे. जुनाजाणता अनुभवी चेहरा, की नव्या दमाचे नेतृत्व याबाबत अटकळबाजी सुरू झाली असून, आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पाठविलेल्या केंद्रीय निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी निर्णय करतील. 

गेहलोतांना पायलटांची टक्कर 
राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कॉंग्रेसमध्ये सध्या संघटना सरचिटणीस असलेले अशोक गेहलोत यांचे नाव पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे; तर प्रदेशाध्यक्ष व तरुण चेहरा असलेले सचिन पायलट हेदेखील शर्यतीत आहेत. बहुमताची जुळवाजुळव आणि अपक्षांना सोबत घेऊन सरकार आणखी भक्कम बनविण्याचा प्रयत्न कॉंग्रेसचा असून, या प्रकारात अशोक गेहलोत अधिक तरबेज मानले जातात. राजस्थानातील जातीय समीकरणांची अनुकूलता हीदेखील गेहलोत यांच्या जमेची बाजू आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या बाजूने निकाल येऊ लागताच गेहलोत यांनी माध्यमांसमोर येऊन अपक्षांना सोबत येण्याचे आवाहन करत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले. पाठोपाठ सचिन पायलट यांनाही आपली इच्छा दर्शविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा लागला. साऱ्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेतृत्वाने कर्नाटकचे प्रभारी असलेले के. सी. वेणुगोपाल यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून राज्यात पाठविण्यात आले आहे, तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे हेदेखील जयपूरला पोचले आहेत. 

ज्योतिरादित्यांचेही लॉबिंग 
मध्य प्रदेशातही प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि राहुल यांच्या जवळच्या वर्तुळातील मानले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी चुरस आहे. माजी सरचिटणीस दिग्विजयसिंह सध्या दुर्लक्षित असले तरी जाणकारांच्या मते अजूनही ते शर्यतीबाहेर नाहीत. मध्य प्रदेश हा भाजपचा आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड मानला जातो. शिवाय भाजपच्या संख्याबळातही कॉंग्रेसच्या तुलनेत फारसा फरक नसल्यामुळे सरकार स्थापनेची कसरत यशस्वीपणे पार पाडणारा आणि भाजपला योग्य प्रकारे चाप लावू शकणारा चेहरा मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा कॉंग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न असेल. अर्थात, या राज्यातील निकालांमध्ये अद्याप स्पष्टता नसल्यामुळे निरीक्षकांची नियुक्ती झालेली नाही. मात्र, कमलनाथ, ज्योतिरादित्य यांनी आपापल्यापरीने पक्ष नेतृत्वाकडे लॉबिंग सुरू केल्याचे कळते. 

बघेल यांची उडी 
छत्तीसगडमध्ये कोणताही चेहरा पुढे न करता कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला असल्यामुळे या राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत स्पष्टता नाही. प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये उडी घेतली आहे. मात्र, कॉंग्रेसच्या या विजयात "ओबीसी मतपेढी'चे महत्त्व पाहता ओबीसी सेलचे प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार ताम्रध्वज साहू यांच्या नावाची चर्चा सर्वोच्च पदासाठी सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात राहुल गांधी यांनी साहू यांना दिलेले महत्त्व हीदेखील त्यांची जमेची बाजू मानली जाते. अर्थात, या राज्यासाठीही अद्याप निरीक्षकांची नियुक्ती झालेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com