घाऊक चलनवाढीचा चार वर्षांचा उच्चांक

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

घाऊक बाजारातील किमतींवर आधारित चलनवाढीचा दर जून महिन्यात 5.77 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. गेल्या चार वर्षांतील चलनवाढीचा हा उच्चांकी दर असून, इंधन आणि भाजीपाल्याच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ चलनवाढीस कारणीभूत ठरली. 

नवी दिल्ली - घाऊक बाजारातील किमतींवर आधारित चलनवाढीचा दर जून महिन्यात 5.77 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. गेल्या चार वर्षांतील चलनवाढीचा हा उच्चांकी दर असून, इंधन आणि भाजीपाल्याच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ चलनवाढीस कारणीभूत ठरली. 

रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचे उद्दिष्ट चार टक्‍के निश्‍चित केले आहे. मात्र, जूनमधील घाऊक चलनवाढीने साडेपाच टक्‍क्‍यांवर झेप घेतल्याने आगामी पतधोरणात बॅंकेकडून व्याजदर वाढवले जाण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात घाऊक चलनवाढीचा दर केवळ 0.90 टक्के होता. जूनमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढला होता. केंद्राच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये अन्नधान्यांच्या किमतींमध्ये 1.80 टक्‍क्‍याची वाढ झाली. याच महिन्यात भाजीपाला तब्बल चारपटीने महागला. भाजीपाल्याचे दर 8.12 टक्‍क्‍यांनी वाढले. मे महिन्यात भाज्यांच्या दरात 2.51 टक्‍के वाढ नोंदवण्यात आली होती. कांदे आणि बटाटेदेखील महाग झाले. बटाट्याच्या किमतींमध्ये 99.02 टक्‍क्‍यांची वाढ झाली; तर कांद्याचा दर 18.25 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे नोंदवण्यात आले आहे. डाळीच्या किमती मात्र 20.23 टक्‍क्‍यांनी कमी झाल्या आहेत. 

या वस्तू महागल्या 
अन्नधान्ये 1.80 
भाजीपाला 8.12 
बटाटे 99.02 
कांदे 18.25 
इंधन 16.18 
वस्तू वाढ (टक्‍क्‍यांमध्ये) 

खाद्यान्न; तसेच इंधनाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चलनवाढीचा चढता आलेख आणि औद्योगिक उत्पादनाच्या सुमार कामगिरीने आर्थिक स्थिती अवघड बनली आहे. चलनवाढीचा दर विकासात अडथळा ठरू शकतो. 
- डॉ. सुनील कुमार सिन्हा, मुख्य अर्थतज्ज्ञ 
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च 

खनिज तेलाच्या किमती, वीजदर आणि कारखाना उत्पादने महागल्याने जूनमधील चलनवाढीने उच्चांक गाठला. - आदिती नायर, मुख्य अर्थतज्ज्ञ "आयसीआरए' 

इंधन दरवाढीचा शॉक 
जागतिक बाजारातील खनिज तेलाच्या वाढत्या किमतीचे पडसाद स्थानिक बाजारात दिसून आले. जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मोठी वाढ झाली होती. सलग दोन आठवडे तेल वितरक कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल दर वाढवण्यात आले होते. यामुळे पेट्रोल आणि डिझेल दराने उच्चांक गाठला. इंधन दरात जूनमध्ये 16.18 टक्‍क्‍यांची वाढ झाली. इंधन दरवाढीचा परिणाम चलनवाढीवर झाल्याचे दिसून आले. 

पुन्हा व्याजदरवाढ अटळ 
रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची 30 जुलैपासून बैठक सुरू होणार आहे. सध्याचा चलनवाढीचा दर हा रिझर्व्ह बॅंकेच्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीसाठी "आरबीआय'ने चलनवाढीचे 4.7 टक्‍क्‍याचे सुधारित उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. सध्याची चलनवाढीची गती पाहता बॅंकेकडून पुन्हा एकदा व्याजदरवाढीचा झटका दिला जाण्याची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर पाव टक्‍क्‍याने वाढवला होता. 

Web Title: Wholesale Inflation Jumps To Nearly four Year High