'वॉशिंग पावडर निरमा'चं पोस्टर लावून अमित शहांचं हैदराबादमध्ये का स्वागत करण्यात आलं? Amit Shah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

निरमाच्या या पोस्टरवर भाजपच्या आठ नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत, जे एकेकाळी इतर पक्षात होते.

Amit Shah : 'वॉशिंग पावडर निरमा'चं पोस्टर लावून अमित शहांचं हैदराबादमध्ये का स्वागत करण्यात आलं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) काल (शनिवार) रात्री उशिरा हैदराबादला (Hyderabad) पोहोचले. इथं त्यांनी हकिमपेटमधील राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमीत (NISA) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) 54 व्या स्थापना दिवस परेडला हजेरी लावली.

दरम्यान, बीआरएस नेत्यांनी (BRS leaders) हैदराबादमध्ये ठिकठिकाणी 'वॉशिंग पावडर निरमा'चे पोस्टर लावून भाजप (BJP) आणि अमित शहांवर निशाणा साधला. या पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे.

निरमाच्या या पोस्टरवर भाजपच्या आठ नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत, जे एकेकाळी इतर पक्षात होते. याच्या खाली वेलकम टू अमित शहा असंही लिहिलंय. तेलंगणातील सत्ताधारी पक्ष बीआरएसच्या नेत्यांचं म्हणणं आहे की, 'विरोधी पक्षात असताना भाजपनं ज्या लोकांवर आरोप केले होते, ते त्यांच्या पक्षात सामील होताच स्वच्छ आणि निष्कलंक झाले आहेत.'

ईडी, सीबीआय आणि इतर एजन्सींच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावण्याचं काम भाजप करत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता दिल्लीतील दारू घोटाळ्यात अडकली आहे. काल (शनिवार) तपास यंत्रणेनं कविता यांची बराच वेळ चौकशी केली.

दिल्ली-एनसीआरच्या बाहेर CISF स्थापना दिन साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशभरात विविध ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सरकारच्या सूचनेनंतर दिल्लीबाहेर हे उत्सव आयोजित केले जात आहेत.