"डसॉल्ट'ने अंबानींना 284 कोटी का दिले? : राहुल गांधी

"डसॉल्ट'ने अंबानींना 284 कोटी का दिले? : राहुल गांधी

नवी दिल्ली : राफेल प्रकरणात सरकारला कोणतीही संधी मिळू द्यायची नाही, यासाठी आक्रमक झालेल्या राहुल गांधींनी आज नवा खुलासा करताना डसॉल्ट कंपनीने अनिल अंबानींना 284 कोटी रुपये का दिले? असा सवाल केला. तसेच, याच रकमेतून अंबानींनी जमीन खरेदी केल्याचाही आरोप राहुल यांनी केला. सीबीआय प्रमुखांना पदावरून हटविण्यामागे राफेल प्रकरण असल्याचीही तोफ राहुल यांनी डागली. 

राफेल लढाऊ विमान खरेदीतील व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "एचएएल' कंपनीचे कंत्राट अनिल अंबानींच्या कंपनीला दिले. यात तीस हजार कोटी रुपये अंबानींच्या खिशात गेले, असा आरोप राहुल गांधी सातत्याने करीत आहेत. याअंतर्गत आज "द वायर' या वृत्त संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. कॉंग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी कंत्राटाबद्दल डसॉल्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी खोटे बोलत असल्याचा दावा केला. 

अनिल अंबानींकडे जमीन असल्यामुळे डसॉल्टने त्यांना कंत्राट दिले, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले असले, तरी प्रत्यक्षात त्यांनी डसॉल्टकडून आलेल्या रकमेतून ही जमीन खरेदी केली. डसॉल्टने अंबानींना लाचेचा पहिला हप्ता म्हणून 284 कोटी रुपये दिले. फक्त आठ लाख रुपये बाजारमूल्य असलेल्या आणि तोट्यात गेलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीला ही रक्कम देण्याचे कारण काय?, असा प्रश्‍न राहुुल यांनी केला. अंबानींकडे जमीन असल्यामुळे त्यांना कंत्राट देण्याची भाषा करणाऱ्या डसॉल्टने आधीच ही रक्कम का दिली?, असा सवाल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला. या व्यवहाराची चौकशी झाली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचणार नाहीत, असाही इशारा त्यांनी दिला. 

सर्वोच्च न्यायालयाला राफेलची किंमत सांगण्याची सरकारची तयारी नाही, या कथित दाव्यांचा समाचार घेताना राहुल म्हणाले, की राफेलची किंमत गोपनीय असल्याचा सरकार दावा करत असले, तरी राफेल कंपनीने आपल्या वार्षिक अहवालात किंमत स्पष्टपणे नमूद केली असून, भारत सरकारने या व्यवहारापोटी किती रक्कम दिली, याचाही उल्लेख आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही गोपनीयता करारामध्ये किमतीबद्दल कोठेही उल्लेख नाही, असे स्पष्ट केले आहे. 

राफेल करारातील या गोंधळामुळेच तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या व्यवहाराशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले. याचाच अर्थ ते नरेंद्र मोदींकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत, असेही शरसंधान राहुल यांनी केले. 

"जेपीसी'मार्फत चौकशी हवी 

"राफेल गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी, यावर सर्व विरोधकांची सहमती असली; तरी सरकार मात्र ही मागणी मान्य करेल, असे वाटत नाही. पंतप्रधान मोदी चौकशीला घाबरतात. सीबीआय प्रमुख राफेल प्रकरणाची चौकशी सुरू करणार, असे कळाल्यामुळेच त्यांना पदावरून हटविण्यात आले. मोदीजींची झोप उडाली असून, ते टेन्शनमध्ये आहेत,'' असा टोलाही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत लगावला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com