Chandrayaan 2 : चंद्रावर स्वारी कशासाठी? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

'चांद्रयान-2'ची वैशिष्ट्ये- 
1) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारी जगातील पहिली अवकाश मोहीम. 
2) मोहिमेसाठी संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर. 
3) चंद्राच्या पृष्ठभागाचा वेध घेणारे पहिले भारतीय पूर्णपणे स्वदेशी यान. 
4) चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद यान उतरविणारा भारत जगातील चौथा देश ठरेल.

चंद्र हा पृथ्वीला सर्वांत जवळचा अवकाशातील घटक आहे. प्रत्यक्ष यान पाठवून त्याचा सखोल अभ्यास करता येऊ शकतो. दूर अवकाशातील मोहिमांसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या तपासणीसाठीही चंद्रावरील मोहीम उपयुक्त ठरते. चांद्रमोहिमेचा उपयोग भविष्यातील अवकाश संशोधनासाठी, नव्या पिढीला प्रोत्साहित करण्यासाठीही होईल. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचीच निवड का? 
चंद्राच्या अभ्यासातून आपल्याला पृथ्वीच्या भूतकाळाविषयीही माहिती मिळू शकते. चंद्राच्या पृष्ठभागावर कोट्यवधी वर्षांमध्ये मोठे बदल झालेले नाहीत. त्यामुळे सूर्यमालेत सूर्याजवळच्या भागात गेल्या कोट्यवधी वर्षांमध्ये घडलेल्या अनेक घटनांचे पुरावे चंद्राच्या पृष्ठभागावर मिळू शकतात. चांद्रभूमीवरील विविध मूलद्रव्ये, खनिजे यांचे नेमके मापन करूनच चंद्राच्या निर्मितीचे रहस्य उलगडू शकते. 

"चांद्रयान-1' या मोहिमेतून चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचे पुरावे मिळाले होते. चंद्राच्या विविध भागांमध्ये, तसेच जमिनीच्या आणि मातीच्या विविध स्तरांमध्ये पाण्याचे वितरण कसे आहे, याची सखोल माहिती जमा करणे आवश्‍यक आहे. चंद्रावरील पाण्याचा उगम शोधण्यासाठी त्याच्या जमिनीचा, तसेच अत्यंत विरळ असणाऱ्या वातावरणाचा अभ्यास आवश्‍यक आहे. 
चंद्राचा दक्षिण ध्रुव हा उत्तर ध्रुवाच्या तुलनेत जास्त काळ अंधारात असतो. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण ध्रुवावर आजही मोठ्या प्रमाणात पाण्याचे अस्तित्त्व असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. याच भागात सूर्यमालेच्या जडण-घडणीच्या काळातील अनेक गुपिते दडल्याचाही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. 

Image

"चांद्रयान-2' मोहिमेतून चंद्राच्या दक्षिण गोलार्धात 70 अक्षांशांवर "मॅन्झीनस सी' आणि "सिम्पेलिअस एन' या दोन विवरांच्या दरम्यान असणाऱ्या मैदानी प्रदेशात "विक्रम' हा लॅंडर आणि त्याच्यासोबत असणारी "प्रग्यान' ही बग्गी उतरविण्यात येईल. 

'चांद्रयान-2'ची वैशिष्ट्ये- 
1) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारी जगातील पहिली अवकाश मोहीम. 
2) मोहिमेसाठी संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर. 
3) चंद्राच्या पृष्ठभागाचा वेध घेणारे पहिले भारतीय पूर्णपणे स्वदेशी यान. 
4) चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद यान उतरविणारा भारत जगातील चौथा देश ठरेल. 

प्रक्षेपक (रॉकेट) 
- भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक मार्क 3 - जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट लॉंच वेहिकल मार्क-3 (जीएसएलव्ही मार्क-3). 
- तीन भागांचे भारताचे सर्वात मोठे रॉकेट. 
- पहिला भाग- एस 200 ः घन इंधनाचा समावेश असणारे दोन रॉकेट बूस्टर. 
- दुसरा भाग - एल 110 ः द्रवरूप इंधनाचा टप्पा. 
- तिसरा भाग - सी 25 ः सर्वांत वरचा, क्रायोजेनिक इंजिनाचा टप्पा (या भागात यान असते). 

चंद्राभोवती फिरणारे यान (ऑर्बिटर) 
वजन - 2379 किलो 
वीज निर्मिती क्षमता - 1000 वॅट 
हे यान चंद्राभोवती 100 बाय 100 च्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. यानावर बसविलेल्या आठ वैज्ञानिक उपकरणांच्या साह्याने चंद्राच्या भूमीचा, तसेच बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यात येईल. चंद्राभोवती फिरणाऱ्या या यानाचा चंद्राच्या भूमीवर उतरलेल्या "विक्रम' लॅंडरशी, तसेच पृथ्वीवरील केंद्राशी संपर्क असेल. 

विक्रम (लॅंडर) 
वजन - 1471 किलो 
वीज निर्मिती क्षमता - 650 वॅट 
विक्रम हा लॅंडर प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरेल. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ लॅंडरचे नामकरण विक्रम असे करण्यात आले आहे. लॅंडर एकाच वेळी पृथ्वीवरील केंद्राशी, चंद्राभोवती फिरणाऱ्या यानाशी, तसेच चांद्रभूमीवर फिरू शकणाऱ्या बग्गीशी संपर्क साधू शकते. चंद्रावर अलगद उतरण्याची यंत्रणा यावर बसविण्यात आली असून, एक चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस इतका त्याचा कार्यकाळ असेल. 

प्रग्यान (रोव्हर) 
वजन - 27 किलो 
वीज निर्मिती क्षमता - 50 वॅट 
सहा चाकांची ही छोटी बग्गी असून, ती चंद्राच्या पृष्ठभागावर साधारणतः 500 मीटर पर्यंत संचार करू शकेल. "प्रग्यान'वर सौरपत्रे बसविण्यात आले असून, ही बग्गी फक्त विक्रम लॅंडरशी संपर्क करू शकते. 

वैज्ञानिक उपकरणे 
"चांद्रयान-2'वर 14 वैज्ञानिक उपकरणे असून, त्यात अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा'च्या उपकरणाचाही समावेश आहे. 

ऑर्बिटरवरील उपकरणे 
1) टेरेन मॅपिंग कॅमेरा 2 (टीएमसी 2) : "चांद्रयान-1'वर बसविण्यात आलेल्या "टीएमसी'चेच हे छोटे रुप आहे. "टीएमसी 2'च्या साह्याने चंद्राच्या जमिनीचे पाच मीटर रिझोल्युशपर्यंत छायाचित्रण करण्यात येईल. चंद्राचा त्रिमितीय नकाशा बनविण्यासाठी, तसेच चंद्राच्या निर्मितीविषयीची माहिती जमा करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होईल. 
2) लार्ज एरिया सॉफ्ट एक्‍स रे स्पेक्‍ट्रोमीटर (क्‍लास) : एक्‍सरे फ्लूरोसन्स (एक्‍सआरएफ) तंत्राचा उपयोग करून "क्‍लास' हे उपकरण चंद्राचा वर्णपट (स्पेक्‍ट्रम) नोंदवेल. सूर्यावरून आलेले क्ष-किरण चंद्राच्या जमिनीवरील मॅग्नेशियम, ऍल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, टायटेनियम, लोह, सोडियम आदी मूलद्रव्यांवर पडतील, तेव्हा त्यांच्यापासून उत्सर्जित झालेले किरण हे उपकरण अभ्यासेल. चंद्राच्या जमिनीवरील मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होईल. 
3) सोलार एक्‍स रे मॉनिटर (एक्‍सएसएम) : सूर्याच्या पृष्ठभागावरून आणि वातावरणातून उत्सर्जित झालेल्या क्ष-किरणांच्या नोंदी घेण्याचे काम हे उपकरण करेल. "क्‍लास' या उपकरणाशी सुसंगत आणि त्याला पूरक "क्ष-किरण' नोंदी घेण्याचे काम हे उपकरण करेल. 
4) ऑर्बिटर हाय रिझोल्युशन कॅमेरा (ओएचआरसी) : चंद्राच्या भूभागाचे उच्च प्रतीचे छायाचित्रण करण्याचे काम "ओएचआरसी' करेल. या उपकरणाचे मुख्य काम "विक्रम' लॅंडरला चंद्रावर उतरवण्यासाठी योग्य जागेची निवड करणे हे आहे. "ओएचआरसी'द्वारे चंद्राच्या जमिनीचे दोन वेगवेगळ्या कोनातून छायाचित्रण केले जाईल. त्यातून "विक्रम'ला उतरवण्यात येणाऱ्या जागेवर असणारे खड्डे, दगड-धोंडे यांची नेमकी कल्पना येईल. "ओएचआरसी'द्वारे 0.32 मीटर (सुमारे एक फूट) इतक्‍या रिझोल्युशनने 12 बाय 3 किलोमीटरच्या क्षेत्राची छायाचित्रे घेता येतील. "विक्रम'ला विलग केल्यानंतरही या उपकरणाचा चांद्रभूभागाचा अभ्यास करण्यासाठी उपयोग करण्यात येईल. 
5) इमेजिंग आयआर स्पेक्‍ट्रोमीटर (आयआयआरएस) : याच्या साह्याने चंद्राच्या संपूर्ण पृष्ठभागावरील खनिजे, तसेच अस्थिर वायूंचे हाय रिझोल्युशनने मापन करण्यात येईल. चंद्राच्या जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या अंशाचे मापन, तसेच चंद्राच्या जमिनीवरून उत्सर्जित झालेल्या सौरऊर्जेचे प्रमाण तपासण्याचे कामही हे उपकरण करेल. 
6) ड्युएल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक ऍपर्चर रडार (सार) : हे "एल' आणि "एस' असे दोन्ही बॅंडचे रडार ऑर्बिटरवर बसविण्यात आले आहे. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशाचे हाय रिझोल्युशन मापन करण्याचे काम सार करेल. त्याचप्रमाणे चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशातील पाण्याचे नेमके प्रमाण शोधणे, चंद्राची वैशिष्ट्यपूर्ण माती असणाऱ्या रिगोलीथच्या थरांचे प्रमाण अभ्यासणे, हेही मुख्य उद्दिष्ट असेल. 
7) ऍटमॉस्फेरिक कंपोझिशनल एक्‍सप्लोरर 2 (एस 2) : "एस 2' हे चांद्रयान 1 मोहिमेतील "एस' या उपकरणाचेच काम पुढे सुरू ठेवेल. चंद्राच्या बाह्य वातावरणात होणारे बदल टिपण्याचे काम हे उपकरण करेल. 
8) ड्युएल फ्रिक्वेन्सी रेडिओ सायन्स (डीएफआरएस) एक्‍सप्रिमेंट : चंद्राच्या आयनांबरामध्ये (आयनोस्फिअर) बदलणारे इलेक्‍ट्रॉनचे प्रमाण तपासण्याचे काम या प्रयोगातून केले जाईल. एकाच वेळी "एक्‍स' आणि "एस' बॅंडवर रेडिओ संदेश प्रसारित केले जातील. या संदेशाच्या बदलत्या दर्जावरून चंद्राच्या आयनांबरातील बदल टिपले जातील. 

'विक्रम'वरील उपकरणे 
1) रेडिओ ऍनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपर सेन्सिटिव्ह आयनोस्फिअर अँड ऍटमॉसफिअर (रंभा) : चंद्राचे आयनांबर हे सतत बदलणाऱ्या "प्लाझ्मा'पासून बनलेले आहे. "रंभा'च्या माध्यमातून चंद्राच्या जमिनीपासून बदलत जाणारी इलेक्‍ट्रॉनची घनता आणि बदलत्या तापमानाची नोंद घेण्यात येईल. सौरवादळांच्या बदलत्या प्रमाणानुसार चंद्राच्या जमिनीजवळच्या भागात "प्लाझ्मा'चे प्रमाण कसे बदलते हेही प्रथमच या उपकरणामुळे समजू शकणार आहे. 
2) चंद्राज सरफेस थर्मो- फिजिकल एक्‍सप्रिमेंट (चास्ते) : या उपकरणामध्ये एक सेन्सर आणि हिटरचा समावेश असून, हे उपकरण चंद्राच्या जमिनीत 10 सेंटिमीटर खोलीपर्यंत रोवण्यात येईल. चंद्राच्या मातीमध्ये उष्णतेचे वहन कसे होते, पृष्ठभागापासून आत तापमान कसे बदलत जाते ते यामुळे समजू शकेल. 
3) इन्स्ट्रुमेंट फॉर ल्यूनार सिझमिक ऍक्‍टिव्हिटी (इल्सा) : हे उपकरण चंद्राच्या जमिनीवर बसणाऱ्या अतिसूक्ष्म हादऱ्यांचीही नोंद घेऊ शकते. 

'प्रग्यान'वरील (रोव्हर) उपकरणे 
1) अल्फा पार्टिकल एक्‍सरे स्पेक्‍ट्रोमीटर (एपीएक्‍सएस) : चंद्राच्या ज्या भागामध्ये यान उतरले आहे, त्या भागातील जमिनीमध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी हे उपकरण वापरण्यात येईल. या उपकरणाच्या माध्यमातून चंद्राच्या जमिनीवर उच्च ऊर्जेच्या अल्फा कणांचा मारा करण्यात येईल. त्यामुळे जमिनीला धडकून उत्सर्जित झालेले क्ष-किरण जमिनीतील मूलद्रव्यांची माहिती देतील. या उपकरणाच्या साह्याने खडकांच्या निर्मितीत समाविष्ट असणाऱ्या सोडियम, मॅग्नेशियम, ऍल्युमिनिअम, सिलिका, कॅल्शियम, टायटेनियम, आयन, तसेच स्ट्रॉन्टीयम, झिरकोनियम आदी घटकांचे अस्तित्व तपासता येईल. 
2) लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्‍ट्रोस्कोप (लिब्स) : चंद्राच्या जमिनीजवळील मूलद्रव्यांचे प्रमाण तपासण्याचे काम याद्वारे होईल. यातून शक्तिशाली लेझरचे झोत मारून त्या वेळी "प्लाझ्मा'कडून होणाऱ्या उत्सर्जनाच्या नोंदी घेतल्या जातील. 

नासाचे उपकरण 
1) लेझर रेट्रो रिफ्लेक्‍टर ऍरे (एलआरए) : पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर अचूकपणे मोजण्यासाठी "नासा'ने हे उपकरण विकसित केले आहे. "प्रग्यान'वर ते बसविण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why ISROs project Chandrayan 2 important for India