esakal | कोरोना प्रतिबंधक लस घेणं का गरजेचं?; ICMR च्या महासंचालकांचं स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
कोरोना प्रतिबंधक लस घेणं का गरजेचं?; ICMR च्या महासंचालकांचं स्पष्टीकरण
sakal_logo
By
अमित उजागरे

देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं वेग घेतला आहे. मात्र, लस घेताना ती का घ्यायला हवी, हे बहुतेकांना माहिती नसतं. एखादी लस किंवा औषध आपण आपल्या शरिरात टोचून घेणार आहोत तर ते का घ्यावं याचं कारणंही तुम्हाला माहिती असायला हवं. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव याबाबत नेमकी माहिती दिली आहे.

भार्गव म्हणाले, "तुम्हाला हे समजून घ्यायला हवं की भारतात परवानगी देण्यात आलेल्या लस या 'डिसीज मॉडिफाईड' लस आहेत. त्यामुळे या लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच तुमच्या शरिरात अँटिबॉडीज तयार होतील. त्यामुळे संसर्गाचं प्रमाण कमी राहण्यास मदत होते. त्याचबरोबर मोठ्या संसर्गाचं आणि मृत्यूचं प्रमाणंही यामुळे कमी होऊ शकतं. लसीकरण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण ८५ टक्क्यांनी कमी होतं.

हेही वाचा: भारतात कोरोनाला रोखण्यासाठी उपाय योजनांवर WHO चे धक्कादायक विधान 

भारतात लसीकरण मोहिमेला जानेवारीच्या मध्यास सुरुवात झाली. यावेळी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना ही लस दिली गेली. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना ही लस दिली गेली. त्यानंतर १ एप्रिलपासून चौथ्या टप्प्यात ४५ वर्षे वयोगटाच्यावरील सर्वांसाठी लस देण्यात येत आहे. दरम्यान, भारतात सोमवारपर्यंत १५,५६,३६१ लसीकरण केंद्रांवरुन लाभार्थ्यांना १०,४५,२८,५६५ डोसेस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली.

इतक्या लोकांनी घेतला पहिला आणि दुसरा डोस

यामध्ये ९०,१३,२८९ आरोग्य कर्मचारी आणि ९९,९६,८७९ कोविड योद्ध्यांनी पहिला डोस घेतला आहे. तर ५५,२४,३४४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी आणि ४७,९५,७५६ कोविड योद्ध्यांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ६० वर्षांवरील ४,०५,३०,३२१ लोकांनी पहिला डोस घेतला असून यांपैकी १९,४२,७०५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचबरोबर ४५ वयोगटापेक्षा पुढील ३,२०,४६,९११ लोकांनी पहिला डोस घेतला असून यांपैकी ६,७८,३६० जणांनी दुसरा डोस घेतला आहे.