बंगाल झालेय राजकीय लढाईचे क्षेत्र; भाजपसाठी हे राज्य का महत्त्वाचे?

वृत्तसंस्था
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

बंगाल महत्त्वाचं का?
- बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा
- लोकसभेत सर्वाधिक जागा असलेले तिसरे राज्य
- ईशान्य भारतात लोकसभेच्या २४ जागा

कोलकाता : गेल्या काही आठवड्यांपासून देशातील राजकीय लढाईचे केंद्र पश्‍चिम बंगालकडे सरकले आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'सीबीआय'च्या चौकशीवरून केलेल्या धरणे आंदोलनाला थेट लोकसभा निवडणुकीची पार्श्‍वभूमी आहे. याचे कारण यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ममतांच्या पक्षासमोर प्रमुख आव्हान भाजपचेच असणार आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमधील कामगिरी पाहिली, तर पश्‍चिम बंगालमध्ये प्रमुख विरोधी पक्षाची जागा हळूहळू भाजपने व्यापली असल्याचे दिसून येत आहे. अजूनही बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस हाच प्रमुख पक्ष असला, तरीही विरोधी पक्ष म्हणून डाव्या पक्षांची जागा भाजपने घेतली आहे.

2009 च्या निवडणुकीपेक्षा 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपला झालेले मतदान जवळपास तिप्पट होते. गेल्या निवडणुकीत भाजपला बंगालमध्ये 17 टक्के मते मिळाली होती. कम्युनिस्ट पक्षांची मते दहा टक्‍क्‍यांनी घटली आणि कॉंग्रेसलाही फटका बसला होता. 2015 नंतर पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या सर्व निवडणुका आणि पोटनिवडणुकांमध्ये भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. 

..म्हणून पश्‍चिम बंगाल महत्त्वाचा! 
गेल्या दोन महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सातत्याने पश्‍चिम बंगालमध्ये दौरे केले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपला साथ दिलेल्या 'हिंदी बेल्ट'मध्ये पुन्हा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती अवघड असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. त्यामुळे या राज्यांमधील घटणाऱ्या जागा इतर राज्यांमधून भरून काढण्यासाठी भाजपची व्यूहरचना आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि दिल्ली या राज्यांमधील एकूण 226 जागांपैकी भाजपने तब्बल 192 जागांवर विजय मिळविले होते. 

त्यामुळे सत्तेत आल्यापासूनच भाजपने ईशान्य भारतावर लक्ष केंद्रीत केले होते. ईशान्य भारतातील सातपैकी सहा राज्यांमध्ये भाजपचे किंवा मित्रपक्षाचे सरकार आहे. या सात राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या 24 जागा आहेत.

शिवाय, पश्‍चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या लढाईतील सुरवातीचे केंद्र पश्‍चिम बंगाल ठरत आहे. 

Web Title: Why West Bengal is important for BJP in Lok Sabha 2019