Independence Day : स्वातंत्र्यदिनी अमित शहा काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 August 2019

गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये दाखल होणार असल्यामुळे तेथे कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिन : जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (ता.15) श्रीनगरला जाणार आहेत. स्वातंत्र्यदिनी तेथील प्रसिद्ध लाल चौकात गृहमंत्री शहा तिरंगा फडकविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये दाखल होणार असल्यामुळे तेथे कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. गृहमंत्री झाल्यानंतर शहा यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा असणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हेसुद्धा ध्वजवंदनासाठी उपस्थित राहू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने गुप्तता पाळली असल्याने या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे गृहमंत्र्यांच्या भेटीचा आगाऊ खुलासा करता येणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रीय तिरंगा फडकावणे, ही गृहमंत्री शहा यांच्या राजकीय कारकीर्दीतील एक नाविन्यपूर्ण घटना ठरणार आहे. 1992 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मोदींसमवेत लाल चौकात तिरंगा फडकावला होता.

1948 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावला होता, तेव्हापासून श्रीनगर शहरातील लाल चौकाला मुख्य व्यापारी केंद्राचे महत्त्व प्राप्त झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Amit Shah unfurl tricolor in Kashmir on Independence Day