'यूपी'तील गुंडगिरी आम्ही मोडून काढू : पोलिस महासंचालक

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

गैरवर्तन करणारे, गुन्हेगार यांच्याविरोधात कारवाई होणारच! यात कुणालाही झुकते माप दिले जाणार नाही. एखाद्याचे राजकीय लागेबांधे असले, तरीही गुन्हा केल्यास त्याच्यावर कारवाई होईल. पोलिसांवर काम करताना कोणताही दबाव येणार नाही, याकडेही लक्ष दिले जाईल. 
- सुलखनसिंह, उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक 

लखनौ : उत्तर प्रदेशमधील गुंडगिरी मोडून काढली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे नवे पोलिस महासंचालक सुलखनसिंह यांनी आज (शनिवार) केले. कायदा हातात घेणाऱ्या 'व्हीआयपीं'नाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (शुक्रवार) रात्री प्रशासकीय बदल्यांना मान्यता दिली. यामध्ये पोलिस महासंचालक पदावरून जावेद अहमद यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी सुलखनसिंह यांची नियुक्ती झाली. सुलखनसिंह हे उत्तर प्रदेशमधील सध्याचे सर्वांत वरिष्ठ 'आयपीएस' अधिकारी आहेत. 

पदभार स्वीकारल्यानंतर सुलखनसिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "राज्यात गुंडगिरी करणारे आणि गुन्हेगारांवर कोणतीही दयामाया न दाखविता कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्या 'व्हीआयपीं'चीही यातून सुटका नाही.'' गेल्या काही महिन्यांपासून गोरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. याविषयी सुलखनसिंह म्हणाले, की गोरक्षेच्या नावाखाली गुन्हे करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होईल. 

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील महिलांची सुरक्षा आणि छेडछाड रोखण्यासाठी 'अँटी रोमिओ' दल सुरू करण्याचे आदेश दिले होते. "या दलातील पोलिस साध्या कपड्यात असतील. ते केवळ आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या, छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करतील. कुणाचीही चौकशी करण्याचे आदेश त्यांना दिलेले नाहीत,' असे सुलखनसिंह यांनी सांगितले. 

Web Title: Will crush Gundagardi in UP, says New DGP