थेट अयोध्येतून : अपील करणार नाही; आता पाठपुरावा नव्या मशिदीसाठी

मंगेश कोळपकर
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

'ते ' का नाही आले या लढ्यात ?
 ओवेसी यांच्यासह अनेकांनी न्यायालयाने दिलेल्या निकलाबद्दल आक्षेप घेतला आहे, त्या बद्दल विचारल्यावर अन्सारी म्हणाले, "आम्ही इतकी वर्षे कोर्टात लढत आहोत, तेव्हा ते कधी आले नाहीत, आता काय करणार ?"

अयोध्या : रामजन्मभूमीच्या कथित जागेवर पुन्हा मशिद उभारावी, या साठी सुप्रिम कोर्टात पुन्हा रिव्ह्यू पिटीशन किंवा अपील करणार नाही, असे या इकबाल अन्सारी यांनी 'सकाळ'शी बोलताना रविवारी स्पष्ट केले. रामजन्मभूमी न्यासाच्या विरोधात गेली 70 वर्षे अन्सारी कुटुंबिय न्यायालयीन संघर्ष करीत आहेत. इकबाल यांचे वडील हाशिम अन्सारी यांनी रामजन्मभूमी न्यास आणि काही हिंदू संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर प्रतिवादी म्हणून याचिका दाखल केली होती.

हाशिम यांचा मृत्यू झाल्यावर इकबाल गेल्या 30 वर्षांपासून या खटल्यात प्रतिवादी आहेत. त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यावर ते म्हणाले "आमच्या दाव्यात तथ्य होते म्हणूनच 70 वर्षे हा खटला चालला. त्यातच सगळं काही आलं. मशिदीमध्ये मूर्ती नेवून ठेवल्या म्हणून ते मंदिर होत नाही, हा आमचा पुराव्यासह केलेला दावा, कोर्टाने मान्य केला नाही." निकलाबद्दल आम्ही काही टिपण्णी करणार नाही. पण आमची उमेद कायम आहे आणि त्यावरच आमचा विश्वास कायम आहे, असेही अन्सारी यांनी सांगितले. 

कोर्टाचा निकाल आम्हाला मान्य आहे, आता 5 एकर जागा आम्हाला लवकर मिळावी म्हणजे आमचीही मशिद लवकर उभारता येईल. पुढच्या काळात हातात त्यासाठीच पाठपुरावा करणार आहोत, असे अन्सारी यांनी स्पष्ट केले. 

'ते ' का नाही आले या लढ्यात ?
 ओवेसी यांच्यासह अनेकांनी न्यायालयाने दिलेल्या निकलाबद्दल आक्षेप घेतला आहे, त्या बद्दल विचारल्यावर अन्सारी म्हणाले, "आम्ही इतकी वर्षे कोर्टात लढत आहोत, तेव्हा ते कधी आले नाहीत, आता काय करणार ?"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will not appeal against Ayodhya Result says Iqbal Ansari