पाकचे 'ब्लॅकमेलिंग' सहन करणार नाही: भाजप

वृत्तसंस्था
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

पाकिस्तानबरोबरची चर्चा तत्काळ बंद करावी व त्या देशाशी राजनैतिक व व्यापारी संबंधही संपुष्टात आणावेत.
- प्रवीण तोगडिया, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष, विश्‍व हिंदू परिषद 

नवी दिल्ली - काश्‍मीरच्या सीमावर्ती भागातील उरीतील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला भारत ठोस प्रत्युत्तर देईलच; पण कोणी आण्विक ब्लॅकमेलिंग करू पाहील, तर भारत ते बिलकुल सहन करणार नाही, असा रोखठोक इशारा भाजप नेते व पक्षाचे जम्मू-काश्‍मीरचे प्रभारी राम माधव यांनी आज दिल्लीत पाकिस्तानला उद्देशून दिला. विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनीही या मुद्द्यावर प्रथमच बोलताना, मारल्या गेलेल्या चौघा दहशतवाद्यांना पुरू नये, तर त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ठेऊन जाळावे अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. 
 

तीनमूर्ती भवनात नेहरू मेमोरियल संस्थेच्या सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमानंतर राम माधव यांनी उरी हल्ल्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, की उरीतील हल्ल्यानंतर संबंधितांना योग्य प्रत्युत्तर देण्याबाबत राजनैतिक आघाडीवर भारतातर्फे जागतिक पातळीवर व्यूहरचना केली गेली व ती अद्याप सुरू आहे. तिचे काही सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. भारत योग्य वेळी योग्य ती कृती करेल यात शंका नाही. मात्र अशा कारवाया कधीही पूर्वसूचना देऊन केल्या जात नाहीत. दहशतवाद हा भ्याड देशाचा अजेंडा आहे. आज कोणालाच आण्विक युद्ध नको असल्याचे सांगताना ते म्हणाले, की कोणत्याही प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला भारत जुमानणार नाही. विशेषतः अण्विक ब्लॅकमेलिंगला तर भारत बिलकुल भीक घालणार नाही. जम्मू-काश्‍मीरच्या सत्तारूढ आघाडीतील किमान 15 आमदार अस्वस्थ असल्याचे वृत्त माधव यांनी हसण्यावारी नेले. ही संख्या कितीही सांगता येईल, त्याला काय अर्थ उरतो, असाही प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. 

Web Title: Will not tolerate, if Pakistan is blackmailing India, says BJP