पनीरसेल्वम यांचा शंखनाद; 'विधानसभेत बहुमत सिद्ध करणार'

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

चेन्नई (तमिळनाडू) - एआयडीएमकेच्या खजिनदार पदावरून हटविल्याने एआयडीएमकेचे नेते ओ पनीरसेल्वम नाराज झाले आहेत. राजीनामा परत घेऊन आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असल्याचे म्हणत त्यांनी शशिकला यांना आव्हान दिले आहे.

चेन्नई (तमिळनाडू) - एआयडीएमकेच्या खजिनदार पदावरून हटविल्याने एआयडीएमकेचे नेते ओ पनीरसेल्वम नाराज झाले आहेत. राजीनामा परत घेऊन आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असल्याचे म्हणत त्यांनी शशिकला यांना आव्हान दिले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पनीरसेल्वम म्हणाले, "मी यापूर्वी कधीही पक्षाचा विश्‍वासघात केलेला नाही आणि भविष्यातही करणार नाही. मी माझा राजीनामा परत घेणार आहे. जर संधी मिळाली तर मला असलेला पाठिंबा विधानसभेत सिद्ध करणार आहे. मी लवकरच राज्यपाल सी. एच. विद्यासागर आणि विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेऊन विधानसभेचे सत्र बोलाविण्याबाबत चर्चा करणार आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या वाटेवरून मी पुढे वाटचाल करत आहे. त्यांच्या इच्छेविरूद्ध मी काहीही करणार नाही. त्या जवळपास 16 वर्षे मुख्यमंत्री होत्या. त्यांची इच्छा होती म्हणून मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो.'

शशिकला या 'तात्पुरत्या सरचिटणीस' असल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. ते म्हणाले, "पक्ष केवळ तात्पुरत्या स्वरूपात सरचिटणीसाची नियुक्ती करू शकतो. पक्षाच्या घटनेनुसार योग्य त्या पद्धतीने निवडणूक घेऊन सरचिटणीसाची नियुक्ती करायला हवी' असे सांगत जनता माझ्या बाजूने असल्याचा दावाही त्यांनी केला.

जयललिता यांची भाची दीपा माधवन हिच्याबाबत बोलताना पनीरसेल्वम म्हणाले, "अम्मांच्या भावाच्या मुलीचा मी नेहमीच आदर करतो. तिला हवा तो सन्मान देऊ इच्छितो. मी बहुमत सिद्ध करेन आणि लोक नेतृत्त्व करतील.' जयललिता यांच्या प्रकृतीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्‍नांबाबत बोलताना या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली असून ही समिती सत्य जगासमोर आणेल, असा विश्‍वास पनीरसेल्वम यांनी व्यक्त केला.

Web Title: Will prove my strength in assembly : Pannerselvam