उद्या होणाऱ्या सुनावणीस साध्वी प्रज्ञा ठाकूर अनुपस्थित राहणार?

Pradnya Thakur
Pradnya Thakur

भोपाळ : भोपाळच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा ठाकूर यांना बुधवार (ता.5) रात्री पोटाच्या वेदनेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आज (गुरुवार) सकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ठाकूर आरोपी असून त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, 7 जून रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी त्यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे ठाकूर उद्या (शुक्रवार) होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहणार का याबाबत संभ्रम कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर यांना आंत्र संक्रमण, पाठदुखी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर अजय मेहतांनी सांगितले की, ठाकूर यांच्या आतड्यांमध्ये सूज आली असून त्यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यामुळे अजून एक-दोन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. 

त्यांच्या सहकारी उपमा म्हणाल्या की, "पोटाशी संबंधित त्रास झाल्याने उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना दवाखान्यातून सोडण्यात आले आहे, परंतु अजूनही तब्येत व्यवस्थित नसल्याने त्यांना रुग्णालयात परत दाखल केले जाईल.

दरम्यान, 3 जून रोजी मुंबईतील विशेष कोर्टाने ठाकूर यांना आठवड्यातून एकदा न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्याच वेळी, ठाकूर यांनी आजारपण आणि संसदेतील औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत सवलत मागितली होती, मात्र न्यायाधीशांनी त्यास नकार दिला होता. या प्रकरणात ठाकूर यांची उपस्थिती आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस दिग्विजय सिंह यांना पराभूत करून प्रज्ञा ठाकूर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती.

मालेगाव प्रकरण काय आहे?
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव बॉम्बस्फोट झाला. यात सात लोक मारले गेले आणि 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. सरकारने हा तपास एटीएसकडे सोपविला होता, पण नंतर ही चौकशी एनआयएकडे सोपविली गेली. एप्रिल 2017 मध्ये, साध्वी प्रज्ञा यांनी 9 वर्षे कारावास भोगल्यानंतर त्यांना सशर्त जामीन देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com