Loksabha 2019: 'जमिनीवरची लढाई कशी असते ते राहुल गांधीना दाखवणार' 

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

- डाव्यांचा कॉंग्रेसला सूचक इशारा 
- राहुल आज उमेदवारी अर्ज भरणार 

वायनाड : कॉंग्रेसने केरळमधील वायनाड येथून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने खवळलेल्या डाव्या पक्षांनी त्यांच्या पराभवाचा निर्धार केला आहे. जमिनीवर निवडणूक कसे लढतात, हे राहुल गांधी यांना दाखवून देऊ, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. कॉंग्रेसने मात्र राहुल येथून सहज विजयी होतील, असा दावा केला आहे. दरम्यान, उद्या (ता.4) रोजी राहुल हे वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील, त्यांच्यासोबत सरचिटणीस आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधीही उपस्थित राहतील. 

वायनाडमधून डाव्या लोकशाही आघाडीने पी. पी. सुन्नर यांना याआधीच उमेदवारी दिली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वायनाडचे नेते विजयन चेरूकारा म्हणाले, "आमच्या उमेदवाराने प्रचाराचे तीन टप्पे केव्हाच पार केले असून, तो चार ते पाच लाख लोकांच्या थेट संपर्कात आहे. चौथ्या टप्प्यामध्ये आम्ही सर्व मतदारांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहोत आणि दोन दिवसांमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल. 

राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते असल्याने त्यांना या मतदारसंघाकडे फारसे लक्ष देणे शक्‍य होणार नाही. राहुल गांधी हे अदृश्‍य देवासारखे आहेत, त्यांना अमेठीतून सहज विजय मिळवता येईल, पण वायनाडची गोष्ट वेगळी आहे. शेतकरी, आदिवासी आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही फ्लॅश मॉबसारखे उपक्रम आखण्याच्या विचारात आहोत.''

राहुल यांच्या उमेदवारीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, केवळ त्यांच्या उपस्थितीमुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी लोकसभेच्या 20 जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेसचे सरचिटणीस डी. पी. राजशेखरन यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Will teach Rahul Gandhi how to fight elections on ground in Wayanad Says Left parties