दिल्लीत आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार: केजरीवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 मार्च 2019

काँग्रेस आणि आप पक्षात आघाडीबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. असे असले, तरी दिल्लीत आप पक्ष स्वबळावर लढेल. विशेष म्हणजे, आम आदमी पक्षाने दिल्लीत सातपैकी सहा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) जाहीर केले. देशात सात टप्प्यांत लोकसभेचे मतदान होणार असून, दिल्लीत 12 मे रोजी मतदान होणार आहे.

केजरीवाल म्हणाले, की काँग्रेस आणि आप पक्षात आघाडीबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. असे असले, तरी दिल्लीत आप पक्ष स्वबळावर लढेल. विशेष म्हणजे, आम आदमी पक्षाने दिल्लीत सातपैकी सहा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. केवळ पश्‍चिम दिल्ली मतदारसंघातून उमेदवार घोषित केलेला नाही. केजरीवाल म्हणाले, की दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीवर आम आदमी पक्ष निवडणूक लढणार आहे. मागच्या वेळी भाजपने दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर भाजपने घूमजाव केला. राज्यातील सर्व मुद्दे जनतेसमोर घेऊन जाणार असल्याचे केजरीवाल म्हणाले. गेल्या दोन दशकांपासून भाजप कशी फसवणूक करत आहे, हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांना सांगणार आहोत. दिल्ली स्वतंत्र राज्य नसल्याने आप सरकार दिल्लीतील जनतेच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकले नाही. यावरूनच दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे आवश्‍यक असून, हीच आप पक्षाची प्रमुख मागणी असेल. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यासाठीच दिल्लीतील मतदार मतदान करतील, असे केजरीवाल म्हणाले. यादरम्यान आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी उद्या (ता. 13) दिल्लीत आपच्या वतीने संपूर्ण राज्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Will win polls without Congress support says Arvind Kejriwal