हरियानात चालत्या कारमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जानेवारी 2018

या युवतीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - हरियानातील फरिदाबाद येथे शनिवारी रात्री कामावरून घरी परतणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर चालत्या कारमध्ये सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरिदाबाद येथून या तरुणीचे अपहरण केल्यानंतर दोन तास तिला गाडीतून फिरविण्यात आले. तिच्यावर सामुहिक बलात्कार झाला असून, तिला साक्री गावाजवळ रस्त्यावर फेकून देण्यात आले. तिचे अपहरण झालेल्या ठिकाणापासून हे अंतर 20 किमी आहे. एसयूव्हीतून आलेल्या युवकांनी तिचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. शनिवारीच फरिदाबाद येथे एका पंधरा वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे नागरिकांकडून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: Woman 22 years Kidnapped Gang-Raped In Moving Car For 2 Hours Near Delhi