
Maternity Leave : बाळाच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनासाठी रजा घेणे महिलेचा अधिकार; हाय कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
गरोदर महिलांसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिला कर्मचाऱ्याला मुलाला जन्म दिल्यानंतरही प्रसूती रजेचा हक्क आहे. मूल जन्माला आले आहे आणि तिच्याकडे बाल संगोपन रजा घेण्याचा पर्याय आहे या आधारावर तिला प्रसूती रजेचा लाभ नाकारता येणार नाही. असा महत्त्वाच निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. (Woman Can Take Maternity Leave Even After The Birth Of A Child Allahabad High Court)
न्यायालयाने म्हटले की, प्रसूती रजा आणि बाल संगोपन रजा या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याचा उद्येशही वेगळा आहे. या दोन्ही गोष्टीचा लाभ घेण्याचा अधिकार महिला कर्मचाऱ्याला आहे.
न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांनी एटाच्या सहाय्यक शिक्षिका सरोज कुमारी यांची याचिका स्वीकारताना हा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी, एटा यांच्याकडे प्रसूती रजेसाठी अर्ज केला होता.
BSA ने 14 नोव्हेंबर 2022 रोजी तिचा अर्ज फेटाळला. पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, बाळाच्या जन्मानंतरही प्रसूती रजा घेता येते.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुलाच्या जन्मानंतर प्रसूती रजा मिळणार नाही, याचिकाकर्ता महिला बाल संगोपन रजा घेऊ शकते, असे बीएसएने म्हटले होते. याचिकाकर्त्याने 180 दिवसांची प्रसूती रजा मागितली होती.
ही मागणी फेटाळण्या आल्यानंतर महिला शिक्षिकेने याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले. याचिका स्वीकारताना न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांनी हा निर्णय दिला आहे. अधिवक्ता सत्येंद्र चंद्र त्रिपाठी यांनी याचिकेवर युक्तिवाद केला.
ते म्हणाले की, मातृत्व लाभ कायद्यानुसार, महिलेला बाळाच्या जन्मापूर्वी आणि नंतर प्रसूती रजा घेण्याचा अधिकार आहे. हा संसदेने संमत केलेला कायदा आहे. BSA ने कायदा समजून घेण्यात चूक केली असून पगार रोखण्याचा आदेशही बेकायदेशीर आहे.
याचिकाकर्त्याला कायद्यानुसार प्रसूती रजेचा हक्क आहे. ती मातृत्व आणि बाल संगोपन रजा दोन्ही घेऊ शकते, जी न्यायालयाने स्वीकारली आणि बीएसएचे आदेश रद्द केले.