'...आता माझ्यावर बलात्कार होणार नाही'

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

उत्तर प्रदेशातील हापुर येथील 23 वर्षीय महिला जीवनाशी लढा देत आहे. पीडीत महिलेला तिच्या वडिलांनी 10 हजार रुपयांना विकले होते. पुढे तिच्यावर किमान 20हून अधिक जणांनी बलात्कार केला.

नवी दिल्लीः मी, 80 टक्के भाजली असून असह्य वेदना होत आहेत. एक बरे वाटते की मी एवढी भाजली आहे की माझे शरीर पाहून माझ्यावर किमान कोणी बलात्कार तरी करणार नाही, ही व्यथा आहे पीडीत बलात्कार महिलेची. पीडीत महिलेने अत्याचाराला कंटाळून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

उत्तर प्रदेशातील हापुर येथील 23 वर्षीय महिला जीवनाशी लढा देत आहे. पीडीत महिलेला तिच्या वडिलांनी 10 हजार रुपयांना विकले होते. पुढे तिच्यावर किमान 20हून अधिक जणांनी बलात्कार केला. या अत्याचाराला कंटाळून तिने पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पेटवून घेतल्यामुळे 80 टक्के भाजली असून, दिल्ली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित महिलेने रडत प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, '28 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशमध्ये मित्राच्या घरी स्वत:ला जाळून घेतले. यामध्ये 80 टक्के भाजली आहे. 2009 मध्ये मी 14 वर्षांची असतानाच वडिलांनी माझा पहिला विवाह लावून दिला. माझे पती माझ्या पेक्षा वयाने खूप मोठे होते आणि काही महिन्यांमध्येच त्यांनी मला सोडून दिले. पुढे काही महिन्यांमध्येच माझ्या वडिलांनी मला 10 हजार रुपयांना विकले. माझा दुसरा पती क्रूर होता. तो माझ्यावर बलात्कार करायचा आणी त्याच्या मित्रांसोबत मला शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडायचा. 20 हून अधिक पुरुषांनी माझ्यावर बलात्कार केला आणि मला ठार मारण्याची धमकी दिली. मला कधीच न्याय मिळाला नाही. मी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला, पण मला कोणीही दाद दिली नाही. वडिलांनीही माझ्याकडे दुर्लक्ष केले. अत्याचार सहन करुन मी थकले होते आणि शेवटी मी आत्महत्येचा निर्णय घेतला. माझा मृत्यू झाला असता तर बरे झाले असते, अशा वेदना कोणालाही असह्य होतील, पण मी आता इतकी भाजली आहे की किमान कोणी माझ्यावर बलात्कार तर करणार नाही.'

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानंतर खळबळ उडाली. महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पोलिस अधीक्षांना पत्र लिहीले आहे. यानंतर मोठ्या प्रमाणात सूत्रे हलल्यानंतर पोलिसांनी पीडीत महिलेचा जबाब नोंदवून घेतला व 14 जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UP woman sold off by father for Rs 10k and gang raped after sets self on fire