दहा हजारांत खरेदी केलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मे 2019

उत्तर प्रदेशमधील एका महिलेची दहा हजार रुपयांना विक्री करण्यात आली. त्यानंतर ज्या लोकांसाठी तिला घरकाम करण्यासाठी भाग पाडले, त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच तिचे दुर्दैव संपले नाही. तिची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर नैराश्‍येतून तिने स्वतःला जाळून घेतले. ही घटना गेल्या महिन्यात घडली. 

मेरठ ः उत्तर प्रदेशमधील एका महिलेची दहा हजार रुपयांना विक्री करण्यात आली. त्यानंतर ज्या लोकांसाठी तिला घरकाम करण्यासाठी भाग पाडले, त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच तिचे दुर्दैव संपले नाही. तिची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर नैराश्‍येतून तिने स्वतःला जाळून घेतले. ही घटना गेल्या महिन्यात घडली. 

ही महिला 80 टक्के भाजली असून, गाझियाबादमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. संबंधित महिलेची तक्रार घेण्यास नकार देणाऱ्या हापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी मालीवाल यांनी पत्रातून केली आहे. वरिष्ठ पोलिसांनी तिला पोलिस स्थानकातून हाकलून दिले, असे आरोप होत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

संबंधित महिलेशी पोलिस स्थानकात गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप मालीवाल यांनी पत्रात केला असून, पोलिस अधिकाऱ्यांच्या असंवेदनशील व लाजिरवाण्या वर्तनामुळे महिलेने स्वतःला जाळून घेतल्याचे त्यात म्हटले आहे. 

मालीवाल यांच्या पत्रानुसार संबंधित महिलेला दहा हजार रुपयांत हापूरमधील एका व्यक्तीला विकण्यात आले. या व्यक्तीने अनेक लोकांकडून कर्ज घेतले होते. अशा सर्व लोकांकडे घरकाम करण्यास त्याने महिलेला भाग पाडले. त्याचे पैसेही तिला दिले नाहीत. घरकाम करण्याऱ्या विविध ठिकाणी तिच्यावर सातत्याने सामूहिक बलात्कार व लैंगिक अत्याचार करण्यात आले. तिने हापूरचे पोलिस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र त्यांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही आणि अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईही केली नाही. यानंतर तिने 28 एप्रिलला जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

या महिलेला योग्य नुकसान भरपाई देण्याचा मागणी मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. दिल्ली महिला आयोगाने यात लक्ष घातल्यानंतर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बाबूगडचे सरपंच व अन्य 13 जणांविरोधात बलात्काराच्या आरोपावरून "एफआयआर' दाखल केली. मात्र प्रथमदर्शनी ही घटना संशयित वाटत असल्याने अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी आरोप फेटाळला 
संबंधित महिलेने स्वतःला जाळून घेतले की तिला जाळण्यात आले, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती हापूरचे पोलिस अधीक्षक यशवीर सिंह यांनी दिली. मात्र पोलिसांनी तिने तक्रार घेण्यास नकार दिला, हा आरोप त्यांनी फेटाळला. या महिलेच्या विवाहाबाबत काही अडचणी होत्या. तिच्यावरील बलात्कार व अत्याचाराच्या घटना या पाच वर्षांपूर्वीच्या असून त्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी घडलेल्या आहेत, असे सिंह म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Sold for Rs 10,000 Gangraped in Meerut