धक्कादायक! हाथरसनंतर बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार; तरुणीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

हाथरस इथं झालेल्या सामूहिक बलात्काराने देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आता आणखी एका तरुणीचा सामूहिक बलात्कारनंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे.

बलरामपुर - हाथरस इथं झालेल्या सामूहिक बलात्काराने देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आता आणखी एका तरुणीचा सामूहिक बलात्कारनंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला अमानुष मारहाण करण्यात आली. नराधमांनी तिची पाठ आणि दोन्ही पाय मोडले आहे. यानंतर पीडितेला रिक्षात बसवून घरी पाठवलं आणि घरात पोहचताच तिने प्राण सोडले अशी माहिती कुटुंबियांनी दिली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलं आहे. तसंच संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

पीडित तरुणीच्या आईने असा आरोप केला आहे की, मुलीला गुंगीचे इंजेक्शन देण्यात आल्याने ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले. सामूहिक बलात्कारानंतर तरुणीला मारहाण करून रिक्षातून घरी पाठवण्यात आलं. इतकी मारहाण झाली होती की तिला बोलता येत नव्हतं. घरी आल्यावर खूप वेदना होतायत आणि आता मी वाचणार नाही असं पीडिता म्हणाल्याचं आईने सांगितलं. 

हे वाचा - हाथरसची घटना म्हणजे देशावरील न पुसला जाणारा डाग ; अभिनेता फरहान अख्तरची उद्विग्नता

दरम्यान, पीडित तरुणीच्या आईने केलेले आरोप सर्व खरे नसल्याचं बलरामपूरचे एसपी देव रंजन वर्मा यांनी सांगितलं. मुलीचे पाय, पाठ मोडली असल्याची गोष्ट खरी नाही. शवविच्छेदन अहवालात याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

सामूहिक बलात्कारानंतर तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या आहेत. तिला झालेल्या जखमांमुळेच मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक देव रंजन वर्मा यांनी सांगितलं की, तरुणी रिक्षाने घरी येत असताना 29 सप्टेंबरला तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तपास केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman who was allegedly gang-raped in Balrampur died