महिला म्हणजे नरकाचे द्वार

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

हा आश्रम आध्यात्मिक स्थान आहे तर तेथे महिला व मुलींनाच कैद का केले आहे? पुरुष आणि मुलांना का केले नाही,' असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर आश्रमाची बाजू मांडणाऱ्या वकिलाने महिला नरकाच्या द्वार असल्याचा हवाला दिला

नवी दिल्ली - दिल्लीतील एका स्वयंघोषित आध्यात्मिक विद्यापीठात महिलांना व मुलींना कैद करून ठेवणाऱ्या वीरेंद्र देव दीक्षित याच्या विरुद्घ दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीत आरोपीच्या वकिलाने "शंकराचार्याच्या म्हणण्यानुसार महिला नरकाचे द्वार आहे,' असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करण्याचा इशारा देत न्यायालय कक्षातून त्यांना हाकलून दिले. ही सुनावणी सोमवारी (ता. 5) झाली.

मुख्य न्यायाधीश न्या. गीता मित्तल आणि न्या. सी. हरी. शंकर यांनी आश्रमाविरोधातील तक्रारीवरुन सुरू असलेल्या तपासात वीरेंद्र देव दीक्षितची चौकशी केली का?, अशी विचारणा केली असता दीक्षितविरोधात "लूक आऊट' नोटीस काढल्याचे "सीबीआय'ने न्यायालयापुढे सांगितले. 'हा आश्रम आध्यात्मिक स्थान आहे तर तेथे महिला व मुलींनाच कैद का केले आहे? पुरुष आणि मुलांना का केले नाही,' असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर आश्रमाची बाजू मांडणाऱ्या वकिलाने महिला नरकाच्या द्वार असल्याचा हवाला दिला. यावर संतप्त झालेल्या न्यायाधीशांनी अशा वक्तव्याबद्दल न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई वकिलावर करण्याचा इशारा दिला. तसेच संबधित वकिलासह सर्वांना त्यांनी न्यायालय कक्षाबाहेर जाण्याचा आदेश दिला.

या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले आहे की, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार या आश्रमाला विद्यापीठाचा दर्जा मिळालेला नाही. त्यावर या वकिलांनी "हा आश्रम ईश्‍वर आपल्या अवताराच्या माध्यमातून चालविला जातो. म्हणूनच तो विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कक्षेत येत नाही,' असे स्पष्टीकरण दिले. या खटल्याची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

Web Title: women door of hell delhi high court