राज्यसभेत बहुमत मिळताच महिला आरक्षण मार्गी

आर.एच.विद्या
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास पी. अशोक गजपती राजू, पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी, बांगलादेशातील संसदेच्या अध्यक्ष शिरीन चौधरी, गांधीवादी विचारवंत इला भट्ट, अभिनेत्री मनीषा कोईराला, तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्यासह बडे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महिला विचारवंत या संसदेत आपले विचार मांडतील.

अमरावती : राज्यसभेत बहुमत मिळताच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार महिलांना संसद आणि विधिमंडळात 33 टक्के आरक्षण देणारे विधेयक मार्गी लावेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी आज केले. पंतप्रधान मोदी हे महिला आरक्षणाचा विषय विसरलेले नसून आता तो दिवसही फार दूर राहिलेला नाही जेव्हा सर्वानुमते हे विधेयक संसदेमध्ये मंजूर होईल, असेही त्यांनी नमूद केले. ते राष्ट्रीय महिला संसदेत बोलत होते.

नायडू म्हणाले, ""आता महिलांनाच प्राधान्य द्यायला हवे, ते पडद्यामागच्या नायिका असतात. आता त्यांना त्यांची जागा आणि आवाज देण्याची वेळ आली आहे, याला नैतिक आधाराचे बळ मिळायला हवे. महिला आरक्षण विधेयक हे तत्काळ मंजूर केले जावे म्हणून माझा पक्ष प्रयत्न करेल, असे आश्‍वासन मी यानिमित्ताने देत आहे. यासाठी केवळ विधेयकच पुरेसे नाही. आपल्याला राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कौशल्यही गरजेचे आहे. राजकीय पक्षांनी यासाठी सर्वप्रथम बदल स्वीकारायला हवा. लैंगिक विषमतेचा आर्थिक विकासावरदेखील विपरित परिणाम होतो. आपल्याला लैंगिक समानता आणणे गरजेचे आहे.'' या वेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या स्त्री सक्षमीकरणाच्या धोरणाचे कौतुक केले. या तीनदिवसीय महिला संसदेचे आयोजन आंध्र प्रदेश विधिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: women reservation bill to be passed after majority in rajyasabha