गोव्यात महिलांना हवे 50 टक्के आरक्षण

अवित बगळे
मंगळवार, 22 मे 2018

गोव्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना 33 टक्के आरक्षण आहे. पण 50 टक्के आरक्षण पाहिजे असल्याची मागणी येथील महिलांनी केली आहे.

पणजी - गोवा प्रदेश महिला काँग्रेसने आज राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांत महाराष्ट्राच्या धर्तीवर 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली. गोव्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांत 33 टक्के आरक्षण आहे.

प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले, की राज्यपालांनी आज तासभर वेळ दिला. त्यांनी महिला काँग्रेसने केलेल्या मागण्या रास्त असल्याचेही यावेळी झालेल्या चर्चेेवेळी नमूद केले. गोव्याच्या विधानसभेत आणि संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावी अशी मागणीही यावेळी केली. यापूर्वी राष्ट्रपती राजनाथ कोविंद, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली होती.

गोव्यात 18 वर्षे झालेल्या युवतींच्या बॅंक खात्यावर सरकार एक लाख रुपये जमा करते. लाडली लक्ष्मी असे त्या योजनेचे नाव आहे. ती रक्कम मिळविण्यासाठी असलेल्या अनेक अटींत विवाह करणे ही एक अट आहे. ती अट हटवावी, अशी मागणी महिला काँग्रेसने आज राज्यपालांकडे केली. विवाहासाठी ही रक्कम मिळत असल्याने त्या रकमेवरून युवतीच्या सासर व माहेरांत तणावाचे वातावरण होते याचा नाहक त्रास त्या युवतीला भोगावा लागतो. याकडे राज्यपालांचे लक्ष वेधल्याचे अॅड. कुतिन्हो यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष बीना नाईक, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावित्री कवळेकर आदी होत्या.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Women want 50 percent reservation in Goa