जिवंत जाळले तरी आता माघार नाही: मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

मोदींच्या मार्गात अडथळे निर्माण करुन वा घाबरवून मोदींना रोखता येईल, अशी "त्यांची' धारणा आहे. मात्र मी मागे हटणार नाही. कोणी मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला तरीही आता मी मागे फिरणार नाही...

गोवा - काळे धन व केंद्र सरकारकडून नुकत्याच घालण्यात आलेल्या 500 व 1000 रुपये किंमतीच्या नोटांवरील बंदीसंदर्भात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (रविवार) भावनावश झाले. सरकारच्या या निर्णयावर केल्या जाणाऱ्या टीकेचा समाचार घेताना पंतप्रधानांनी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

पंतप्रधान म्हणाले -
 

# कुटूंब, घर यांसह माझ्याकडे असलेल्या सगळ्याचा मी देशासाठी त्याग केला आहे.

# मलाही वेदना जाणवतात. मात्र कोणत्याही स्वरुपाच्या आढ्यतेखोरापणामधून वा घमेंडीमधून हा निर्णय घेण्यात आलेला नाही. मी गरिबी पाहिली आहे आणि लोकांच्या समस्यांचीही मला जाणीव आहे

# देशामधील प्रामाणिक नागरिकाची काळ्या धनाच्या समस्येपासून सुटका करण्यासाठीच हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे

# याआधीच्या सरकारांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मी काही लपविले का? आपल्या देशातील तरुणांच्या भविष्यास आपणांस वेठीस धरावयाचे आहे काय? यावरुनही ज्यांना राजकारण करावयाचे आहे ते खुशाल करोत.

# सध्याची आपात्कालीन परिस्थिती 50 दिवसांकरिता राहिल. मात्र या अवधीत देशाच्या होणाऱ्या स्वच्छतेनंतर एक "डास'ही उडू शकणार नाही. 2 जी स्पेक्‍ट्रम्सारख्या गैरव्यवहारात गुंतलेले लोक आज 4 हजारांकरिता बॅंकांच्या रांगेत उभे आहेत

# माझ्याकडून एखादी चूक घडल्यास देशाकडून त्याची जाणारी शिक्षा मला मान्य असेल. मात्र मी भ्रष्टाचारमुक्त भारताचे आज आश्‍वासन देतो
माझ्याविरोधात काम करणाऱ्या शक्तींची मला जाणीव आहे. ते कदाचित मला जिवंत राहु देणार नाहीत. त्यांनी देशाची गेली 70 वर्षे केलेली लूट आता धोक्‍यात आल्याने माझे नुकसान करण्याचा ते प्रयत्न करतील. पण मी तयार आहे.

# लोकांनी आमच्या सरकारला निवडून दिले आहे आणि त्यांच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 2014 मध्ये अनेक नागरिकांनी देशास भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी मतदान केले. तेव्हा देशाची झालेली लूट व भारताबाहेर गेलेला पैसा; या दोन्हींची माहिती गोळा करणे आमचे कर्तव्य आहे

Web Title: won’t back down, says emotional PM