वर्क व्हिसाद्वारे सीरियाकडे जाणाऱ्यांमध्ये वाढ

श्‍यामल रॉय - सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 एप्रिल 2017

अनेक जण इसिसला जाऊन मिळाल्याचा "आयबी'ला संशय

कोलकाता : वर्क (कामगार) व्हिसाद्वारे कोलकतामधून सीरिया व लगतच्या देशांकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर येत असून, या प्रकारामुळे गुप्तचर विभागाला (आयबी) गोंधळात टाकले आहे. 2016 या वर्षभरात किमान 2025 जणांनी देश सोडला असून, या सर्वांना खरेच काम मिळाले, का ते इसिस या दहशतवादी संघटनेला जाऊन मिळाले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पश्‍चिम बंगालमधील अनेक जिल्हे, तसेच जवळच्या राज्यांतून इसिसचा प्रभाव असलेल्या सीरिया, इराक, इराण, लेबनान आणि इतर देशांकडे जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी एजन्सींच्या माध्यमातून अनेक जण पश्‍चिम आशियाई देशांत काम मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा सुमारे 2025 नागरिकांनी गेल्या वर्षी देश सोडल्याचे स्पष्ट झाले असून, यातील अनेक जण इसिसमध्ये भरती झाल्याचा संशय आयबीला आहे.

ही बाब आयबीसाठी चिंतेचा विषय ठरली असून, देश सोडून गेलेल्या या नागरिकांच्या हालचालींवर आयबी लक्ष ठेवून आहे. यापूर्वी इसिसशी संबंधित अनेक व्यक्तींना अटक झाल्याच्या पार्श्वभूमिवर देश सोडून गेलेल्यांपैकी अनेक जण इसिसला जाऊन मिळाल्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे.

इसिसमध्ये जाण्यासाठी पर्यटनाचाही बहाणा
कोलकताहून विमानाने थेट सीरिया किंवा तुर्कस्तानला जाता येत नाही; मात्र या नागरिकांच्या व्हिसावर नियोजित ठिकाणांचा उल्लेख आहे. टुरिस्ट (पर्यटन) व्हिसाद्वारे गेल्या वर्षी सुमारे 44 हजार नागरिक सौदी अरेबियाला गेले होते. यातील बहुतांशी हज यात्रेकरू होते. याबरोबर तुर्कस्तान व जॉर्डनला गेलेल्यांपैकी अनेक जण इसिसमध्ये भरती झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्यावरही नजर ठेवली जात असल्याची माहिती आयबीने दिली.

Web Title: work visa and syria