गोव्याचा स्क्वॅशपटू यश फडते अजिंक्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

स्क्वॅशपटू यश फडतेने चेन्नई येथे खेळविण्यात आलेल्या १७ वर्षांखालील ओपन स्क्वॅश स्पर्धेत दिल्लीच्या दिवाकर सिंग याचा ३-० सेटनी पराभव करून अजिंक्यपद मिळविले.

मुरगाव (गोवा) - झुआरीनगर वास्को येथील एम ई एस उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी तथा गोव्याचा प्रतिभावान स्क्वॅशपटू यश फडतेने चेन्नई येथे खेळविण्यात आलेल्या १७ वर्षांखालील ओपन स्क्वॅश स्पर्धेत दिल्लीच्या दिवाकर सिंग याचा ३-० सेटनी पराभव करून अजिंक्यपद मिळविले.

भारतीय स्कोश अकादमीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत यश फडतेला चौथे मानांकन प्राप्त झाले होते. त्याने उपांत्य सामन्यात अव्वल सिडेड दिल्लीच्या संकल्प आनंद याचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

अंतिम सामन्यात यशने ११/७, ११/५ आणि ११/६ अशा फरकांनी सरळ तीन्ही सेट जिंकून यंदाच्या अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. यापूर्वी २०१४ साली यशने १३ वर्षांखालील गटाचे अजिंक्यपद पटकावले होते.
   
दरम्यान, यश फडतेने हल्लीच अमेरिकेत खेळविलेली १७ वर्षांखालील ज्युनिअर ओपन स्पर्धा जिंकून पहिला भारतीय बनण्याचा मान मिळवला होता. गोव्याच्या या १६ वर्षाच्या युवा स्क्वॅशपटूची कामगिरीची दखल घेऊन १९ वर्षांखालील विश्व चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धा जुलैमध्ये चेन्नई येथे खेळविण्यात येणार आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Yash Phadte won the squash game at goa