योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी- कॉंग्रेसची मागणी

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

आदित्यनाथ यांनी नुकतीच कुशीनगर जिल्ह्यातील मैनपूर, दिनापत्ती गावांना भेट दिली. तत्पूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुसहर येथील काही दलित कुटुंबांना साबण व शॅम्पूचे वाटप करून मुख्यमंत्र्यांना भेटताना आंघोळ करून येण्यास सांगितले होते.

नवी दिल्ली : दलित कुटुंबांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांना साबण व शॅम्पूचे वाटप करून अपमान केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी कॉंग्रेसने आज केली आहे.

आदित्यनाथ यांनी नुकतीच कुशीनगर जिल्ह्यातील मैनपूर, दिनापत्ती गावांना भेट दिली. तत्पूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुसहर येथील काही दलित कुटुंबांना साबण व शॅम्पूचे वाटप करून मुख्यमंत्र्यांना भेटताना आंघोळ करून येण्यास सांगितले होते. हा प्रकार संतापजनक असून, त्यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी आदित्यनाथ यांनी माफी मागावी, असे कॉंग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

या कृत्यामुळे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा चेहरा समोर आला असून, योगी आदित्यनाथ योगी नव्हे, तर भोगी आहेत, असेही संघवी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पूर्ण समाजाची माफी मागावी, या प्रकरणी मुख्यमंत्री व संबंधित प्रशासकीय कर्मचाऱ्यांविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, असेही संघवी यांनी नमूद केले.

Web Title: yogi adityanath apology congress demand dalit shampp