'यूपी'तील बदलांबाबत आदित्यनाथांची मोदी, शहांशी खलबते

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 एप्रिल 2017

राजस्थानात एकाचा खून करणाऱ्या गोरक्षकांच्या मुद्‌द्‌यावरून राज्यसभेत कॉंग्रेसने सलग दोन दिवस वातावरण तापविले आहे. राजनाथसिंह हे आज (सोमवार) तेथे विरोधकांचा मारा झेलणार आहेत. या साऱ्या विषयांवर दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यावर ते रविवारी दुसऱ्यांदा राजधानीत पोचले. त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी खलबते केली. उत्तर प्रदेश प्रशासनातील काही महत्त्वाच्या व होऊ घातलेल्या नियुत्यांबद्दल आदित्यनाथ यांनी उभय नेत्यांबरोबर चर्चा केली.

दिल्लीच्या विज्ञान भवनात आंतरराज्य परिषदेची 11 वी स्थायी समिती बैठक रविवारी झाली. तीत आदित्यनाथ सहभागी झाले होते. तब्बल 12 वर्षांनी केंद्राने ही बैठक बोलावली होती. केंद्राकडून जाणाऱ्या निधीचा उत्तर प्रदेशात गेल्या 14 वर्षांत योग्य विनियोग झालेला नसल्याचे सांगितले जाते. या निधीचा योग्य विनियोग होण्याबाबत या परिषदेत चर्चा झाली.

या बैठकीनंतर आदित्यनाथ यांनी शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. उत्तर प्रदेशात भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीबाबत मुख्यतः चर्चा झाली. केशव प्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्री केल्यावर त्या जागी भाजपच्या एखाद्या आमदारांची नियुक्ती करण्याच्या हालचाली आहेत. उत्तर प्रदेशाने सव्वातीनशे आमदार देऊनही त्यापैकी एकही जण पंतप्रधान मोदी -अमित शहा यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपदासाठी योग्य वाटू शकले नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या एखाद्या ज्येष्ठ आमदाराला प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या हालचाली आहेत. स्वतः आदित्यनाथ व मौर्य हे उत्तर प्रदेशात गेल्याने किमान चार ते पाच जागांसाठी पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. तेथील उमेदवारांबद्दलही या वेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

राजनाथ यांच्याशीही चर्चा
आदित्यनाथ यांनी राजनाथसिंह यांच्याशीही दिल्ली दौऱ्यात चर्चा केली. यूपीचे मुख्यमंत्री या नात्यानेही राजनाथ हे आदित्यनाथ यांचे पूर्वसुरी असल्याने उभय नेत्यांतील चर्चा महत्त्वाची मानली जाते. उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था सुधारणे, हा विषय आपल्या प्राधान्यक्रमावर असल्याचे आदित्यनाथ यांनी वारंवार सांगितले आहे. प्रत्यक्षात त्यांनी स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनीनेच एका चर्चवर हल्ला केल्याने तो वादाचा विषय ठरला आहे.

Web Title: yogi adityanath discusses changes with modi, shaha