योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींच्या यादीत पन्नास नव्या नावांची भर पडली आहे. त्यामध्ये राजस्थान भाजपचे अध्यक्ष ओ. पी. माथूर, जम्मू-काश्‍मिरमधील जुगल किशोर शर्मा, मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमच्या मालक नीता अंबानी, योगगुरू बाबा रामदेव यांच्या नावांचाही समावेश आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नकार दिल्यानंतरही त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असून त्यांना व्हीव्हीआयपी व्यक्तींना असलेली सशस्त्र सुरक्षा रक्षकांची झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली  आहे. देशातील एकूण 450 अतिमहत्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येते.

गुप्तचर विभागाने आदित्यनाथ यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर संभाव्य धोका निदर्शनास आणून दिल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत आदित्यनाथ यांच्यासोबत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे 25-28 सशस्त्र कमांडो (सीआयएसएफ) कायम सोबत असतील. ते देशभरात जेथे जातील, तेथे हे कमांडो त्यांच्यासोबत असतील. 'मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून आता त्यांना सतत, ते देशात जेथे जातील तेथे सीआयएसएफचे कमांडो सक्षम सुरक्षा पुरवतील. शिवाय त्यांच्या अधिकृत निवासस्थानीही अशीच सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल', अशी माहिती सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तींच्या यादीत पन्नास नव्या नावांची भर पडली आहे. त्यामध्ये राजस्थान भाजपचे अध्यक्ष ओ. पी. माथूर, जम्मू-काश्‍मिरमधील जुगल किशोर शर्मा, मुंबई इंडियन्स  आयपीएल टीमच्या मालक नीता अंबानी, योगगुरू बाबा रामदेव यांच्या नावांचाही समावेश आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नकार दिल्यानंतरही त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

Web Title: Yogi Adityanath gets Z Plus security, joins elite club of 450 VIPs