गाझीपूर सीमेवर योगींनी लाइट, पाणी केलं बंद; केजरीवालांचे आमदार टँकर घेऊन पोहोचले

ghazhipur border.jpg
ghazhipur border.jpg

नवी दिल्ली- 26 जानेवारीला दिल्लीत हिंसाचार झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांनी आंदोलन संपवले. गुरुवारी सायंकाळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्याचबरोबर प्रशासनाने तेथील लाइट आणि पाण्याचा पुरवठाहा बंद केला. परंतु, त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आपण इथून जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर संपूर्ण वातावरणच बदलले गेले. रिकाम्या झालेल्या गाझीपूर सीमेवर शेतकरी पुन्हा येऊ लागले. त्यानंतर पोलिसांना तेथून जावे लागले. दरम्यान, शेतकरी आंदोलनावरुन आधीपासूनच राजकारण सुरु आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक लढणार असल्याची आम आदमी पक्षाने घोषणा केली आहे. त्यांनी ही संधी सोडली नाही. योगी सरकारने सीमेवरील वीजपुरवठा आणि पाणी पुरवठा बंद केल्यानंतर गाझीपूर सीमेवर टँकर पोहोचवण्याची व्यवस्था आपने केली. कोंडलीचे आपचे आमदार कुलदीप कुमार रात्री एकच्या सुमारास टँकर घेण्यासाठी दिल्ली जल बोर्डच्या प्लांटवर पोहोचले. त्यांनीच टि्वट करुन याची माहिती दिली आहे. 

कुलदीप कुमार यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, रात्री उशिरा शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले होते. शेतकऱ्यांना पाण्याची सोय करण्यासाठी मी दिल्ली जल बोर्डच्या प्लांटवर पोहोचलो आहे. मी माझ्या शेतकरी बंधूंना विश्वास देऊ इच्छितो की, आम्ही तिथे पाण्यापासून ते टॉयलेटपर्यंत, कोणत्याही वस्तूची कमतरता पडू देणार नाही. हे सर्व टँकर गाझीपूर सीमेवर पोहोचतील आणि शेतकरी बंधूंना पाणी देतील. 

आपचे खासदार संजय सिंह यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचे म्हटले. त्यांनी राकेश टिकैत यांनी अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली आहे. आप संपूर्णपणे शेतकऱ्यांसोबत आहे. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे आणि शेतकऱ्यांवर हल्ला करण्याचा कट रचला. प्रशासनाने पाणी बंद केले इतकेच काय शौचालयही हटवले. या हुकूमशाहीचा निषेध. संसदेत आपकडून हा मुद्दा उपस्थितीत केला जाईल. 

दरम्यान, अनेक शेतकरी नेत्यांविरोधात केंद्र सरकारकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकरी नेत्यांवर दबाव वाढला आहे. असे असले तरी भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आंदोलन मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. माध्यमाशी बोलताना त्यांना रडू कोसळल्याचा एक व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com