महिला आमदारांसाठी विधानसभा सत्र कौतुकास्पद; योगी आदित्यनाथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath statement UP Assembly session commendable women MLA politics

महिला आमदारांसाठी विधानसभा सत्र कौतुकास्पद; योगी आदित्यनाथ

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाचे आज दिवसभराचे सत्र महिला आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आले. फक्त महिला आमदारांसाठीच्या या विशेष सत्राचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले. महिला आमदारांच्या सूचनांची राज्य सरकारला ठोस पावले उचलण्यासाठी मदत होईल, असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभेची सदस्यसंख्या ४०३ असून त्यापैकी ४७ सदस्य महिला आहेत. यात प्रथमच आमदार झालेल्या २२ महिला सदस्यांचाही समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात पाच महिला मंत्री आहेत.

ते यावेळी म्हणाले, की देशातील सर्वांत मोठी असलेली उत्तर प्रदेशची विधानसभा आज नवीन इतिहास घडवीत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतर विधानसभेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील २५ कोटी जनतेपर्यंत महिला आमदारांचा आवाज पोहोचत आहे. त्याचवेळी, राज्याच्या समस्या आणि कामगिरी तसेच इतर महत्त्वाचे मुद्दे सभागृहात मांडण्याची संधीही या महिला आमदारांना मिळाली आहे. खरे तर याआधीच महिला आमदारांसाठी विशेष सत्र राखीव ठेवायला हवे होते.

निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला आमदारांना अल्पकाळासाठी का होईना विधानसभेचे पीठासीन अधिकारी म्हणून संधी द्यायला हवी, असे सांगून आदित्यनाथ म्हणाले, की त्यामुळे योग्य वातावरणनिर्मिती होण्यात मदत होईल. महिलांना समान दर्जा देण्याची ही पहिलीच वेळ नसून स्वातंत्र्यानंतर या दिशेने अनेक प्रयत्न करण्यात आले. भारतीय राज्यघटनेने प्रथमपासून पुरुष व महिलांना मतदानाचा अधिकार दिला आहे. ब्रिटनसह इतर अनेक देशांनी महिलांना मतदानाचा अधिकार नंतर दिला, असेही त्यांनी नमूद केले. पुरुष आमदारांना उद्देशून ते मिस्कीलपणे म्हणाले, की एरवी पुरुष आमदारांच्या गदारोळामुळे महिला आमदारांचा आवाज दबला जातो. तुमची चूक लक्षात आली तर तुम्ही तुमच्या घरात कान पकडून माफी मागायला हवी. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

महिला आमदारांसाठी विशेष सत्र का?

उत्तर प्रदेश विधानसभेत आम्हाला बोलण्यासाठी कमीवेळा संधी मिळत असल्याची तक्रार महिला आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांच्याकडे गेल्या आठवड्यात केली होती. त्यानंतर, विधानसभेच्या १९ ते २३ सप्टेंबर या काळातील पावसाळी अधिवेशनात एक दिवस महिला आमदारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतला होता.

वैदिक काळात महिलांना समान हक्क

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी यावेळी महर्षी वेद व्यास यांनी महिला सशक्तीकरणाबाबत लिहिलेल्या ओळीही सांगितल्या. वैदिक काळात प्राचीन भारतात महिलांना पुरेसे वैयक्तिक स्वातंत्र्य व पुरुषांप्रमाणेच समान अधिकार होते. शिक्षणाबाबतही कोणता भेदभाव केला जात नसे. गुरुकुलमध्ये मुलांप्रमाणे मुलींनाही प्रवेश दिला जात असे. गार्गी, मैत्रेयी या त्या काळातील प्रमुख महिला तत्वज्ञ होत्या.

Web Title: Yogi Adityanath Statement Up Assembly Session Commendable Women Mla Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..