योगी आदित्यनाथ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ 

वृत्तसंस्था
रविवार, 19 मार्च 2017

राष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्षाने गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले होते.

लखनौ - उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी आज (रविवार) शपथ घेतली. तर, केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदासह अन्य 44 जणांनी शपथ घेतली.

आज दुपारी दोनच्या सुमारास लखनौमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि सर्व प्रमुख भाजप नेते, आमदार उपस्थित होते. याबरोबरच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव व ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादवहेही उपस्थित होते. 

राष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्षाने गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले होते. याचबरोबर प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा या दोघांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचेही या वेळी जाहीर करण्यात आले होते. आज यांचा शपथविधी पार पडला.

उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर कोण असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी झालेल्या या बैठकीत आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजप नेते सुरेश खन्ना यांनी आदित्यनाथ यांच्या नावाची शिफारस केली आणि नायडू यांनी त्याला पाठिंबा दिला. सर्व सहमतीनेच आदित्यनाथ यांना निवडण्यात आल्याचे आणि या पदासाठी इतर कोणाचेही नाव पुढे न आल्याचे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळेस खासदार म्हणून निवडून आलेले योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड केल्याने भाजपवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. गोरखपूरमधील गोरखनाथ मठाचे प्रमुख असलेले आदित्यनाथ हे विज्ञान शाखेचे पदवीधर असून, आपल्या आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत.

Web Title: Yogi Adityanath takes oath as Uttar Pradesh Chief Minister