'युपी'तील शासकीय इमारतीत पान मसाला, गुटख्यावर बंदी

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील शासकीय कार्यालयांच्या आवारात पान मसाला आणि गुटख्यावर बंदी घातली आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील शासकीय कार्यालयांच्या आवारात पान मसाला आणि गुटख्यावर बंदी घातली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी आज (बुधवार) लखनौ येथील सचिवालयाच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना इमारत स्वच्छ ठेवण्याची सूचना केली. "यावेळी त्यांनी राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये पान मसाला, प्लॅस्टिक आणि तंबाखू वापरण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले', अशी माहिती उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिली. सरकारच्या कामाबाबत बोलताना मौर्य म्हणाले, 'सरकारचे काम सुरू आहे. धीर बाळगा. तुम्हाला लवकरच बदल दिसतील. आतापर्यंत दोन कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत.' सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्यनाथ यांनी राज्यातील गायींच्या तस्करीवर संपूर्णपणे बंदी आणण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील जाहीरनाम्यात बेकायदा सुरु असलेल्या कत्तलखान्यांवर बंदी आणि सर्व प्रकारच्या यांत्रिक कत्तलखान्यांवर बंदीचे आश्‍वासन देण्यात आले होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी आदित्यनाथ यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांची संपत्ती पंधरा दिवसांच्या आत जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Yogi bans pan masala, tobacco in govt. buildings in UP