गर्लफ्रेंडसाठी केले तिच्याच भाच्याचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

अपहरण झाले गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी! होय, अपहरणकर्त्याने मुलाच्या बदल्यात चक्क गर्लफ्रेंडची मागणी केली. 

हैदराबादमध्ये एका 8 वर्षीय मुलाचे अपहरण झाले. अपहरणकर्त्याने मुलाच्या घरी पैसे मागितले नाही. ना कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीची मागणी केली आणि ना हे अपहरण फार खोल वैमानस्यातून झाले. मग अपहरण झाले तरी नेमके कशासाठी? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर हे अपहरण झाले गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी! होय, अपहरणकर्त्याने मुलाच्या बदल्यात चक्क गर्लफ्रेंडची मागणी केली. 

तेलंगणाच्या वानपर्ती जिल्ह्यातील कोथाकोटातून एका 8 वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. पोलिसांनी अपहरणकर्त्याचा कट हाणून पाडत 24 तासातच प्रकरणाचा छडा लावला आणि मुलाची सुटका केली. चंदू नायक असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. 7 एप्रिलला कोथाकोटातील शाळेतून त्याचे अपहरण झाले होते. 23 वर्षीय वामसी कृष्ण याने चंदूचे अपहरण केले. चंदूच्या आत्यासोबत वामसीचे प्रेमसंबंध होते. पण या प्रेमाची मुलीच्या घरी खबर लागताच घरच्यांनी वामसीला मारहाण केली आणि धमकी दिली. म्हणून या रागात मुलीच्या घरच्यांना धडा शिकवण्यासाठी हा कट रचल्याचे त्याने पोलिसांनी पकडल्यावर कबुल केले. 

अपहरणानंतर वामसीने चंदुच्या घरच्यांना फोन करुन 'चंदू सुखरुप हवा असेल तर माझ्या गर्लफ्रेंडला माझ्याकडे पाठवा' अशी धमकी दिली.  
आरोपी रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर वामसी पुणे स्थानकात उतरताच पोलिसांनी त्याला अटक केली आणि अपहृत मुलाची सुटका केली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A Young Boy Kidnapped 8 Years Old Boy Demands His Girlfriend