हकालपट्टी केलेल्या युवा नेत्यांची होणार घरवापसी

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

अखिलेश यांचे पारडे जड
गृहकलहा वेळी अखिलेश यांची बाजू घेणाऱ्या युवा नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी करून त्यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच, रामगोपाल यांच्या घरवापसीमुळे शिवपाल यादव यांपेक्षा अखिलेश यांचेच पारडे जड ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लखनौ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबात पडलेली फूट व त्यामुळे झालेले परिणाम पाहता समाजवादी पक्षातून हकालपट्टी केलेल्या युवा नेत्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याचे संकेत आहेत. पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केलेले राज्यसभा सदस्य रामगोपाल यादव यांच्या घरवापसीनंतर या चर्चेने राज्यात जोर धरला आहे.

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असून, पक्षात कोणतेही मतभेद नाहीत, असे चित्र समोर मांडण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाकडून सुरू आहे. पक्षातील बेबनावाची स्थिती कायम राहिली तर, त्याचा फायदा बसपा, भाजपसह विरोधी पक्षांना होईल. याची पुरती जाण समाजवादी पक्षास आहे. हकालपट्टी झालेल्या व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या काही युवा नेत्यांनी मुलायमसिंह यादव यांची नुकतीच भेट घेतल्याने इतर नेत्यांनाही पुन्हा पक्षात येण्याचे निमंत्रण धाडले जाण्याची दाट शक्‍यता आहे.

एमएलसीचे सुनील सुजन, आनंद भदौरिया व संजय लाठर तसेच, युवानेते गैरव दुबे, दिग्विजयसिंह देव, ब्रजेश यादव यांसह इतर काही नेत्यांनी मुलायमसिंह यांची भेट घेतली आहे. भेटीत मुलायमसिंह यादव यांनी त्यांच्यावर पक्षाने केलेल्या कारवाईबद्दल माफी मागितल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. या सर्व नेत्यांनीही आपल्याला पुन्हा पक्षात सामावून घेत पक्षाला बळकट करण्यासाठी संधी द्यावी, अशी विनंती केल्याचे सांगण्यात आले.

मुलायमसिंह यादव यांच्या जवळचे मानले जाणारे बेनीप्रसाद वर्मा, रेवती रमण यांच्याकडे दुरावलेल्या नेत्यांना जवळ आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली. कौटुंबिक वाद टोकाला गेल्यानंतर लखनौ व इतर जिल्ह्यांतील अनेक युवानेते, पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले होते. तर, काहींची हकालपट्टी करण्यात आली होती.

अखिलेश यांचे पारडे जड
गृहकलहा वेळी अखिलेश यांची बाजू घेणाऱ्या युवा नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी करून त्यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच, रामगोपाल यांच्या घरवापसीमुळे शिवपाल यादव यांपेक्षा अखिलेश यांचेच पारडे जड ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नेता ते कार्यकर्ता
हकालपट्टी, राजीनामे दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदांवर शिवपाल यादव यांनी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यामुळे पुन्हा पक्षात येऊ इच्छिणारे नेते व पदाधिकाऱ्यांना त्यांची पूर्वपदे मिळण्याची शक्‍यता धूसर वाटते.

Web Title: young leaders to be recalled in samajwadi