युवकांनी आत्मनिर्भर बनणे गरजेचे : नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 4 March 2021

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींमुळे या क्षेत्राला रोजगारपूरक बनविण्यासाठी आणखी बळ मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. आत्मनिर्भर भारतासाठी देशाचा युवक आत्मनिर्भर बनणे अत्यावश्‍यक असल्याचेही ते म्हणाले.

नवी दिल्ली - यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींमुळे या क्षेत्राला रोजगारपूरक बनविण्यासाठी आणखी बळ मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. आत्मनिर्भर भारतासाठी देशाचा युवक आत्मनिर्भर बनणे अत्यावश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित झालेल्या उच्चशिक्षणविषयक वेबीनारला संबोधित करताना मोदींनी सांगितले, की भारताच्या बुद्धिमान युवा पिढीला आज संपूर्ण जगातून वाढती मागणी आहे. भारतीय युवक प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षण क्षेत्राचे सार्वकालिक महत्त्व ओळखून आमच्या सरकारने यंदा अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रापाठोपाठ या क्षेत्रासाठी तसेच कौशल्य विकास, संशोधन व नवाचाराच्या विषयांसाठी भरीव तरतूद केल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, की नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातही रोजगाराभिमुख उच्चशिक्षणावर भर देण्यात आला आहे. ज्ञान व संशोधन या विषयांना कोणत्याही बंधनात अडकवणे देशासाठी अन्यायकारक ठरेल. आत्मनिर्भर देशासाठी युवकांमध्ये तो गुण विकसित होणे प्रथम आवश्‍यक असते. शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन या गोष्टींशी हे सारे परस्परपूरक आहे. युवकांसाठी कृषी, अंतराळ संशोधन, परमाणू ऊर्जा यासारखी क्षेत्रे खुली करून देण्याचे धोरण आमच्या सरकारने म्हणूनच अमलात आणले आहे. 

तमिळनाडूत राजकीय भूकंप; शशिकलांचा राजकीय संन्यास!

स्टार्टअपसाठी हॅकेथॉन नवीन परंपरा
व्यक्तिगत, बौद्धिक, औद्योगिक व गुणवत्ता या साऱ्या क्षेत्रांत नवीन दिशादर्शक इको प्रणालीत परिवर्तन करण्यासाठी देश आज वेगाने पुढे जात असल्याचे नमूद करताना मोदींनी सांगितले, की भारतात पहिल्यांदाच अटल टिंकरिंग लॅबपासून उच्चशिक्षण संस्थांमध्ये अटल इनक्युबेशन केद्रांसारख्या संस्थांवर विशेष भर दिला गेला आहे. स्टार्टअप्ससाठी हॅकेथॉनची नवीन परंपरा सुरू झाली व तीच युवकांसाठी मोठी शक्ती बनत आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young people need to become selfreliant narendra modi