ऐन गर्दीत रस्त्यावरील तरुणीस ओढले गाडीत...

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

रस्त्यावर कॅब बुक करण्यासाठी थांबली असताना एका स्कॉर्पिओ गाडीमधून आलेल्या आरोपीने तिला गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे भांबावलेल्या तरुणीने घरी पोहोचल्यानंतर फेसबुकच्या माध्यमामधून या भयावह प्रकारास वाचा फोडली

गुरुग्राम - भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरापासून अवघ्या 32 किमी अंतरावर असलेल्या गुरुग्राम शहरामधील गजबजलेल्या भागामधून पंचविशीतील एका तरुणीचे थेट अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हरयाना राज्यामधील या शहरामधील "इफको चौक' भागामध्ये काल संध्याकाळी ही घृणास्पद घटना घडली.

संबंधित तरुणी जयपूर येथून आलेल्या एका बसमधून नुकतीच उतरली होती. यानंतर ती रस्त्यावर कॅब बुक करण्यासाठी थांबली असताना एका स्कॉर्पिओ गाडीमधून आलेल्या आरोपीने तिला गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे भांबावलेल्या तरुणीने घरी पोहोचल्यानंतर फेसबुकच्या माध्यमामधून या भयावह प्रकारास वाचा फोडली.

याचबरोबर, गुरुग्राममधील इतर महिलांना तिने यासंदर्भात इशाराही दिला. संबंधित तरुणी ही सायबसर सिटीमधील एका आयटी कंपनीत काम करते. ही घटना घडलेले ठिकाण हे गुरुग्राममधील सर्वांत गजबजलेल्या ठिकाणांपैकी एक आहे.

""रस्त्यावर प्रचंड गर्दी होती आणि मी रस्ता ओलांडत होते. अचानक एक गाडी माझ्या पुढ्यात येऊन उभी राहिली. गाडीतील मनुष्याने माझा हात धरत मला गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला. मी कसातरी माझ्या पाय गाडीच्या दारावर ठेवण्यात यश मिळविले व सर्व शक्तिनिशी त्याचा प्रतिकार केला. याचबरोबर, मी बचावासाठी किंकाळ्याही फोडल्या. दरम्यान, तेथील सिग्नल बदलल्याने त्याने मला ढकलून देत घटनास्थळावरुन पोबारा केला,'' असे या तरुणीने म्हटले आहे.

आकस्मिक घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. बंगळूरमध्ये जमावाने अनेक महिलांच्या केलेल्या विनयभंगाच्या गंभीर घटनेच्या पार्श्‍वभूमीवरच घडलेल्या या अन्य एका घटनेमुळे देशभरातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाल्याचे मानले जात आहे.

Web Title: Young woman grabbed in middle of Gurugram road