पीएमसी' बॅंकेबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019


रिझर्व्ह बॅंकेच्या प्रतिनिधींनी घेतली आंदोलकांची भेट

मुंबई : सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंक (पीएमसी) प्रकरणी 25 ते 27 ऑक्‍टोबरदरम्यान तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन रिझर्व्ह बॅंकेने दिले आहे. "पीएमसी' बॅंकेतील गैरव्यवहारांमुळे रिझर्व्ह बॅंकेने कलम "35 ए' अंतर्गत निर्बंध लागू केले असून, पैसे काढण्यावर मर्यादा घातली आहे. याप्रकरणी बॅंकेचे खातेदार आणि ठेवीदारांकडून मंगळवारी (ता.22) मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. या वेळी रिझर्व्ह बॅंकेच्या प्रतिनिधींनी पीएमसी बॅंक ठेवीदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्‍वस्त केले. 

या आंदोलनादरम्यान रिझर्व्ह बॅंकेच्या प्रतिनिधींनी ठेवीदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. पीएमसीच्या ग्राहक आणि ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. गव्हर्नर शक्तिकांत दास मुंबईबाहेर असून, ते आल्यानंतर या प्रकरणात तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन रिझर्व्ह बॅंकेच्या प्रतिनिधींनी ठेवीदारांना दिले. येत्या 25 ते 27 ऑक्‍टोबरदरम्यान ही घोषणा होईल, असे या प्रतिनिधींनी म्हटले आहे. ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने रिझर्व्ह बॅंकेच्या प्रतिनिधींशी 19 विविध मुद्द्यांबाबत चर्चा केली. त्याशिवाय निर्बंधांनंतर आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या ठेवीदारांच्या वारसांना 25 लाखांची मदत देण्याची मागणी या वेळी करण्यात आली आहे. 

खातेदारांची काळी दिवाळी 
आजच्या आंदोलनात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 21 गुरुद्वारांचे प्रतिनिधी आणि शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रिझर्व्ह बॅंकेने तडकाफडकी घातलेल्या निर्बंधांचा या वेळी निषेध करण्यात आला. आंदोलकांनी काळी दिवाळी करण्याच्या घोषणा या वेळी दिल्या. ज्या कर्जबुडव्यांनी पीएमसी बॅंकेची कर्जे थकवली आणि ज्यांनी नियमबाह्य पद्धतीने कर्जमंजुरी केली त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मत पंजाब अँड महाराष्ट्र बॅंक डिपॉझिटर्स असोसिएशनचे महासचिव विश्‍वास उटगी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Your money is safe, RBI assures depositors