आंध्रप्रदेशला विशेष राज्याच्या दर्जासाठी आणखी पाच खासदारांचे राजीनामे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

''केंद्र सरकारविरोधात तब्बल 12 वेळा अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता. मात्र, या अविश्वासदर्शक ठरावावर लोकसभेत एकदाही चर्चा घेण्यात आली नाही''.

- वाराप्रसाद राव वेळगापल्ली, खासदार, वायएसआर काँग्रेस

नवी दिल्ली : आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी वायएसआर काँग्रेसच्या पाच खासदारांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचे राजीनामे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे दिले आहेत. सरकार आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यास 'अपयशी' ठरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएतून बाहेर पडले. त्यानंतर आता वायएसआर पक्षाच्या या खासदारांनी राजीनामे दिले आहेत.

YSR congress MP resign

चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्यात यावा, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. 2018-19 या वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्पात आंध्रप्रदेश राज्याच्या विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून राज्याला भरघोस निधी देण्यात आला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या चंद्राबाबूंनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. चंद्राबाबूंच्या या निर्णयानंतर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनीदेखील आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत मागणी केली होती. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने त्यांनीदेखील त्यांच्या पक्षाच्या खासदारांना राजीनामे देण्यास सांगितले. 

त्यानुसार वायएसआर काँग्रेसचे व्ही. वारा प्रसाद राव, वाय. व्ही. सुब्बा रेड्डी, पी. व्ही. मिधूम रेड्डी, वाय. एस. अविनाश रेड्डी आणि मेकापती राजामोहन रेड्डी या सर्व खासदारांनी त्यांचे राजीनामे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे दिले आहेत. 

''केंद्र सरकारविरोधात तब्बल 12 वेळा अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता. मात्र, या अविश्वासदर्शक ठरावावर लोकसभेत एकदाही चर्चा घेण्यात आली नाही'', असे वायएसआर काँग्रेसचे खासदार वाराप्रसाद राव वेळगापल्ली यांनी सांगितले. 

  

Web Title: YSR Congress five MP resign from Lok Sabha over Andhra special status