खासदाराचे कोरोनामुळे निधन; पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

देशात गेल्या आठवड्याभरात दररोज 90 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. 

चेन्नई : आंध्र प्रदेशचे माजी मंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे खासदार बल्ली दुर्गाप्रसाद राव (वय ६३) यांचे येथील अपोलो रुग्णालयात आज कोरोना संसर्गामुळे निधन झाले. राव यांना दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते संसर्गातून बरे झाले होते आणि त्यांची चाचणीही निगेटिव्ह आली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना श्‍वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला होता. उपचार सुरु असतानाच आज त्यांचे निधन झाले.

तेलुगू देसम पक्ष सोडून वायएसआर काँग्रेसमध्ये दाखल झालेले राव हे तिरुपती लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्याआधी ते चार वेळेस आंध्र प्रदेशचे आमदार होते. गेल्या काही दिवसांत चेन्नईमध्ये निधन झालेले राव हे दुसरे खासदार आहेत. दहा दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार एन. वसंतकुमार यांचेही निधन झाले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राव यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. खासदार दुर्गा प्रसाद राव गारू यांच्या मृत्यूमुळे दु:खी आहे. ते एक अनुभवी नेता होते. आंध्र प्रदेशच्या विकासात त्यांनी योगदान दिलं होतं. माझ्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत अशा शब्दांत मोदींनी शोक व्यक्त केला. 

वयाच्या 26 व्या वर्षी राजकारणात पाऊल टाकलेले दुर्गा प्रसाद राव हे तेलगु देसमचे संस्थापक एनटी रामा राव यांच्यापासून प्रभावित झाले होते. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील गुडूर विधानसभा मतदारसंघातून दुर्गाप्रसाद हे चार वेळा आमदारही होते. 2019 मध्ये ते वायएसआर काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा खासदार झाले होते. त्याआधी आंध्र प्रदेश सरकारमध्ये मंत्रीपदही भूषवलं होतं. 

हे वाचा - राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर चीनला झोंबली मिर्ची; ग्लोबल टाइम्समधून युद्धाची धमकी

भारतात कोरोनाच्या आकडेवारीने 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्या जगात कोरोना रुग्णसंख्येबाबत भारत आघाडीच्या दोन देशांमध्ये आहे. देशात गेल्या आठवड्याभरात दररोज 90 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. याशिवाय असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कोरोना झाला आहे की नाही याची माहितीच नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ysr congress mp durga prasad passes away due to corona