निर्लज्जांनो, गोरक्षकांना इस्लामचे सामर्थ्य दाखवा: झाकीर मुसा

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

भारताला पूर्णत: "इस्लाम'मय करण्यासाठी लढण्यात येणाऱ्या "गझ्वा ए हिंद' या जिहादी युद्धात सहभागी न होणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेचा दहशतवादी असलेल्या झाकीर मुसा याने टीका केली आहे.

नवी दिल्ली - भारताला पूर्णत: "इस्लाम'मय करण्यासाठी लढण्यात येणाऱ्या "गझ्वा ए हिंद' या जिहादी युद्धात सहभागी न होणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेचा दहशतवादी असलेल्या झाकीर मुसा याने टीका केली आहे. याआधी काश्‍मीरमधील "हिझबुल मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या असलेल्या मुसा याने आता अल कायदामध्ये प्रवेश केला आहे.

भारतामध्ये मुस्लिमांवर होत असलेल्या "अत्याचारां'चा उल्लेख करत मुसा याने हे युद्ध केवळ काश्‍मीरपुरतेच मर्यादित नसल्याचे स्पष्ट केले आहे. इस्लाम व पाखंडांमधील (इनफिडेल्स) हे युद्ध असल्याची भावना मुसा याने व्यक्त केली आहे.

"अन्याय व दडपशाहीविरोधात बोलूही न शकणारा भारतीय मुस्लिम हा अत्यंत निर्लज्ज समुदाय आहे. आपले प्रेषित मोहम्मद व त्यांच्या अनुयायांनी आपल्यास हेच शिकविले आहे काय? त्यांनी आपल्या भगिनींच्या मानासाठी युद्धामध्ये रक्‍त सांडत बलिदान केले. ते संख्येने केवळ 313 होते; मात्र त्यांनी जगावर राज्य केले. संख्येने केवळ कोट्यवधी असलेले आपण मात्र केवळ गुलाम आहोत,'' असे बद्रच्या इतिहासप्रसिद्ध लढाईचा संदर्भ देत मुसा याने म्हटले आहे. प्रेषितांच्या काळात बद्र येथे झालेल्या लढाईस इस्लाममध्ये अत्यंत संवेदनशील स्थान आहे.

"तुम्हाला अजूनही संधी आहे. आमच्याबरोबर या युद्धामध्ये उतरा; अन्यथा फार उशीर होईल. गोरक्षकांना इस्लामचे सामर्थ्य दाखवून देऊ,'' असे मुसा याने आपल्या चिथावणीखोर संदेशामध्ये म्हटले आहे.

याआधीही हिझबुल मुजाहिदीनमध्ये असताना मुसा याने काश्‍मिरी युवकांनी भारतीय सुरक्षा दलांवर "काश्‍मिरी राष्ट्रवादासाठी नव्हे; तर इस्लामसाठी' दगडफेक करावी, असे आवाहन केले होते. 

"आपल्या दगडफेकीमधून केवळ एका संघटनेला मदत होते आहे, असा विचार करु नका. या दगडफेकीमधून खऱ्या अर्थी इस्लामला मदत होणार आहे. इस्लामच्या संरक्षणासाठी दगडफेक करा. आमच्या काश्‍मीरमध्ये एक दिवस आम्ही इस्लामचा ध्वज उभा करु. काश्‍मीरमध्ये आम्ही इस्लामसाठीच संघर्ष करत आहोत आणि आम्हाला इस्लामसाठी बलिदान द्यावयाचे आहे,'' असे मुसा याने म्हटले होते. 

Web Title: zakir musa slams spineless indian muslims