20 वर्षे अंडर ग्राउंड राहिलेले बनले मिझोरामचे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मिझोराममध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) ने काँग्रेसचा पराभव करत सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. दहा वर्षांनी काँग्रेसला सत्तेतून हटविण्यात यश आले आहे. जोरामथंगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. 74 वर्षीय जोरामथंगा यांनी नुकतेच आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते. 

ऐझवाल : मिझोरामचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणारे जोरामथंगा हे 20 वर्षे अंडर ग्राऊंड राहिलेले आहेत. जोरामथंगा यांनी आज (शनिवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मिझोराममध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) ने काँग्रेसचा पराभव करत सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. दहा वर्षांनी काँग्रेसला सत्तेतून हटविण्यात यश आले आहे. जोरामथंगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. 74 वर्षीय जोरामथंगा यांनी नुकतेच आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते. 

या आत्मचरित्रात त्यांनी लिहिले आहे, की 1966मध्ये लालडेंगा यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल मिझो फ्रंटने (एनएमएफ) भारतापासून स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला होता. पूर्वेकडील राज्यांत नागा विरोधानंतर हा सर्वांत मोठा होता. मात्र, 1986 मध्ये सरकार आणि एमएनएफ यांच्या मिझोराम पीस एकॉर्डवर स्वाक्षरी करण्यात आली होती. जोरमथंगा या संघटनेत 1966 मध्ये सहभागी झाले होते. तेव्हापासून ते 1986 पर्यंत भूमिगत राहून काम करत होते. त्यांनी आपल्या 20 वर्षांच्या प्रवासाचा पुस्तकात उल्लेख केला आहे. 

जोरामथंगा यांच्या नेतृत्वाखालील एमएनएफने 1998 मध्ये सर्वप्रथम सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर त्यांनी 2003 मध्ये सत्ता कायम राखली होती. 2008 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर काँग्रेसची याठिकाणी सत्ता होती. आता पुन्हा दहा वर्षांनंतर त्यांना सत्ता मिळाली आहे. 

Web Title: Zoramthanga sworn in as Mizoram's new CM